Powered By Blogger

Friday, 18 December 2020

भाग 3 : व्यक्तीस्वातंत्र्य, सामाजिक बंधने आणि मैत्री, प्रेम

🌷 ती : hi
🌱 तो : बोल, काय म्हणतेस ? आपण दोन दिवस खूपच बोललो ना.
🌷 ती : होय रे. इतकं सविस्तर सोशल मीडियावर बोलणं म्हणजे खूपच झालं. 
🌱 तो : होय. विषयच तसा मुक्तसंवादाचा आहे ना.
🌷 ती :  पण मला हे समजत नाही की इतके मुक्त संबंध ठेवायचे असतील तर लग्नाचा देखावा तरी कशाला? निव्वळ औपचारिकता म्हणून?
🌱 तो :  हे तुझे म्हणणे मला शंभर टक्के मान्य आहे. अनेकांची इच्छा असूनही सामाजिक बंधने म्हणून लोक लग्न करतात. काही जण धाडसाने आज ही लिव्ह इनमध्ये रहातात. तुम्ही कितीही क्रांतिकारक असला तरी हजारोवर्षांची संस्था एकट्याला मोडता येत नसते आणि सर्वांचा विरोध पत्करून एकानेच किल्ला लढविण्यासाठी त्याला आयुष्यही पुरणार नाही.
🌷 ती : तू लग्न का केलंस? Live in चा पर्याय का स्वीकारला नाही?
🌱 तो : होय. मी live in चा पर्याय निवडला होता. पण मला जातीबाह्य लग्न करून दोन जातीच्या व्यक्ती एकत्र नांदू शकतात, हा आजच्या परिस्थितीत संदेश द्यायचा होता. मी त्याला अग्रक्रम दिला. केवळ आणि केवळ या उद्देशाने मी लग्न केले.
🌷 ती : तू मानत नाहीस ना विवाह संस्था? मग याच संस्थेला शरण का गेलास? त्यासाठी लग्नाच्या औपचारिकतेची गरज नव्हती. लग्न न करताही ते साध्य करता आलं असतं.
🌱 तो : शरण नाही, त्या संस्थेचे फक्त नाव वापरले
आणि मी या समाजाचा भाग आहे. इच्छा नसताना काही नियम पाळले जातात.  नवीन रचना मी एकटा नाही ना करू शकत. पण प्रयत्न करतो आहे.  
🌷 ती : हेच ते. आपण समाजाचा एक भाग आहोत म्हणून सामाजिक नियम आपल्यालाही लागू होतात. त्यात जोडीदाराशी एकनिष्ठ राहणं हाही नियम आहे आणि ते स्त्री पुरुष सगळ्यांनाच लागू आहे. 
🌱 तो : एकनिष्ठतेबद्दल आपण बोललो आहोत. आजच्या कुटुंब, विवाह संस्थेतील जेजे तोडणे, झुगारने शक्य आहे, ते झुगारावे, तोडावे. तिच्यात राहूनच त्या व्यवस्थेला आतून शक्य तितके धक्के दिले पाहिजेत. 
🌹 ती : लग्न सुद्धा स्वातंत्र्याला बाधक आहे, कारण शेवटी तेही एक सामाजिक बंधन आहे.
🌱 तो : होय की. 
🌷 ती : Exactly हेच म्हणायचंय मला. सामाजिक नियम मान्य असतील तरच लग्न करा, अन्यथा करू नका. तुमच्यावर कोणीही जबरदस्ती करत नाही. पण आयुष्याचा जोडीदार म्हणून कुणाला स्वीकारलं आहे, तर तिच्याशी प्रामाणिक रहा, पारदर्शक रहा. खरं प्रेम असेल, तिथं विश्वास आपोआप येतो. तिथं कसलीही लपवाछपवी करायची गरजच पडत नाही.
🌱 तो : यातील अनेक वाक्य एकमेकांशी परस्पर विसंगत आहेत.
1) सामाजिक नियम कुणी ठरवले ? जसे सामाजिक नियम पळायचे असतात, तसे ते मान्य नसतील तर तोडायचेही असतात. मात्र सामजिक नियम मान्य नसतील तर समाजात राहू नये, असे बोलणे अयोग्य ठरेल. 
2) कुटुंबाचे, विवाहाचे नियम कुणी ठरवले. 100 वर्षांपूर्वी होते, ते आज नियम नाहीत. मग ते कुणी आणि का बदलले. मग आज कुणी बदलत असेल तर त्यात गैर काही नाही.
3) लग्न नव्हे तर प्रत्येक नात्याची कमिटमेंट असते. संसार म्हणून जबाबदारी आणि साथीदाराचे समाधान हे कुटुंब, संसार याची कमिटमेंट आहे, असे मी मानतो. या पलीकडे कोण काय करते, हा व्यक्ती स्वातंत्र्य भाग आहे. ते स्वातंत्र्य घेतले म्हणजे कमिटमेंट नाही, असे म्हणणे हे म्हणणे गैर आहे.
पण कुणी कौटुंबिक जबाबदारी पाळली नाही, साथीदारचे समाधान केले नाही आणि बाहेर प्रेम मैत्री शोधली, तर अशा व्यक्तीची संसारात कमिटमेंट आहे असे कुणी म्हणत असेल तर ते हास्यास्पद आहे. आणि आज असंख्य लोक असेच वागतात आणि यालाच कमिटमेंट म्हटले जाते. त्यामुळे संसार हे शोषनाचे मूळ बनले आहे.
4) खरं प्रेम आणि खोटं प्रेम असे काहीही नसते. प्रेम हे प्रेम असते. बाकी कल्पनाविलास आहे. 
5) विश्वास, एकनिष्ठता, सुचिता, प्रामाणिकपणा हे शब्द संसारात बंधन म्हणून वापरले जातात.
🌷 ती : आपल्याला कुटुंब, विवाह संस्था मान्य नसतानाही विशिष्ट सामाजिक नियमांचा स्वीकार करायला लागणे, हे आपण हतबल आहोत किंवा समाज वरचढ आहे, हे दर्शवते. समाज बदलण्याची ताकद आपल्यात आहे ना? मग का करावेत मनाविरुद्ध असे नियम मान्य? का जावं अशा नियमांना शरण? मला एवढंच कळतं, जे नियम आपल्याला मान्य नाहीत, ते बिनधास्त उडवून लावावेत. केवळ समाजाचा एक भाग म्हणून त्यांचा आश्रय घेऊ नये.
🌱 तो : अनेकांनी पूर्वीपासून आणि आजही या विवाह, कुटुंब व्यवस्थेचे जाचक नियम लावलेच की धुडकावून. आंतरधर्मीय विवाह हा विवाह संस्थेचा नियम नाही. बालसंगोपन, स्त्रीला घर कामात मदत हा विवाह संस्थेचा नियम नाही. हे नियम मोडले की अनेकांनी. विवाह संस्थेचे सर्व नियम एक व्यक्ती नाही मोडू शकत. एकाने नियम मोडणे हेही क्रांतीकारी असते. मुलींनी शिकू नये, याबाबत ही आता तू प्रतिवाद करते तसे तेव्हा केले जायचे. आपल्या व्यवस्थेत तर मुलींनी शिकणे म्हणजे पाप, धर्म बुडाला, स्त्री बिथरली असे समजले जायचे. महात्मा फुलेही सर्व नियम नाही नाकारू शकले, पण स्त्री शिकली पाहिजे. हा नियम त्यांनी तोडला. एक नियम मोडला तरी खूप मोठे परिवर्तन घडले. समाजाचे सर्व चुकीचे नियम, प्रथा एका झटक्यात मोडण्याची अपेक्षा ठेवणे हे बाळबोध आहे आणि मोडायचे तर सर्व नियम मोडा नाही तर मग आहे ते सर्व स्वीकारा, हे तर अतिबालिश झाले. कोणतेही परिवर्तन टप्प्याटप्य्याने येते हे लक्षात घेतले पाहिजे.
🌷 ती : तुझे विचार चूक आहेस, असं मी म्हणत नाही. पण एखादी विचारधारा स्वीकारताय तर पूर्णपणे स्वीकारा ना. आपल्या सोयीनुसार हे अर्ध, ते अर्ध असं नको.
🌱 तो : व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून पूर्णतः हेच स्वीकार अथवा तेच स्वीकारा, असे म्हणायला तसा काही अर्थ नाही. तिथे हवे ते स्वीकारले जाते. पण तरी आपण या मुद्द्याकडे कायद्याच्या नजरेतून पाहू. आपण कायद्याच्या राज्यात रहातो. येथे विवाहबाह्य संबंध अमान्य नाही. त्यामुळे विवाहबाह्य संबंध ठेवू नयेत, या विवाह संस्थेच्या अलिखित नियमाला अर्थ उरत नाही. आणि हेच करा किंवा तेच करा, यालाही अर्थ नाही. 
🌷 ती : विवाहबाह्य संबंध कायद्याला अमान्य आहेत.
तो : 150 वर्षे जुने असलेले भारतीय दंड विधान संहितेतील कलम 497 सर्वोच्च न्यायालयाने का रद्द केले ? आणि त्याने काय स्वतंत्र मिळाले, हे नक्की वाच. दोन वर्षपूर्वीच विवाहबाह्य संबध खुले केले. तेही मोदी सरकारच्या काळात. या कलमांतर्गत पूर्वी विवाहबाह्य संबध असतील तर त्या स्त्रीचा नवरा दुसऱ्या पुरुषवर केस करू शकायचा. पाह किती बोगस कलम होते. एखाद्या स्त्रीला संबंध हवे असतील, तिने ठेवले, तिला मान्य आहेत संबंध आणि केस कोण करणार तर तिचा नवरा. आता पतिपत्नी विवाहबाह्य संबध ठेवू शकतात. नवरा दुसऱ्या पुरुषावर केस करू शकत नाही. फसवणूक झाली तर एकमेकांवर दोघेच केस करू शकतात,
हा नियम तसा सगळीकडे आहे. तो इथेही लागू होतो.
ती :  अर्थात हे ज्याचं त्याचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. कुणी कसं वागावं, हे दुसऱ्यांनी कसं ठरवायचं ? मनावर दडपण येणार नाही, अशा पद्धतीने वागावं बस.
🌱 तो : स्वातंत्र्य मी मानतो, पण स्वराचार मानत नाही.
मी जे सांगतो आहे तसे स्वतंत्र येईलच,  पण अजून खूप शतके जावी लागतील.
🌷 ती :  तुझं म्हणणं बरोबर असेलही. पण मी एवढंच म्हणेन की, आपला कायदेशीर जोडीदार सोडून इतर कुणाशी संबंध ठेवण्यास आपल्याला काही नैतिक अडचण वाटत नसेल, आपण कम्फर्टेबल असू तर खुशाल ठेवावेत संबंध. पण आपण काही चुकीचं करतोय, आपल्या जोडीदाराशी cheating करतोय, या भावनेनं आपल्याला अपराधी वाटायला नको.
🌱 तो : अत्यन्त बरोबर आणि या व्यतिरिक्त वागण्यात समाधान देखील नाही. आपण दोघे या एकाच मतावर आलो का फायनली ?
🌷 ती : असू दे की मतभेद. मित्र आहोत म्हणून प्रत्येक गोष्टीवर एकमत असलंच पाहिजे असं कुठं आहे?
🌱 तो : मला मतभेद असण्यात काहीही अडचण नाही.
मदभेद कुठवर कमी झाले, यासाठी मी विचारले
आणि तुझे ते समारोपाचे वाक्य आणि मी कालपासून जे बोलतोय, ते एकच आहे. त्यामुळे मी मतभेद कमी झालेत असे समजतो.
🌷 ती : असू नये एकमत. रंगत येते छान.
🌱 तो : आपण दोघे या मतावर आलो का फायनली. 
🌷 ती : असं म्हणू शकतो.!!
तो : खूप वर्षांनी मी बोललो या विषयावर बघ
🌷 ती : बरं वाटलं असेल नं?
🌱 तो : जगण्यात, मनात विचार तर आहेच
पण बोलल्यावर बरे वाटले
🌷 ती : All credit goes to me
🌱 तो : होय. चल बाय
🌹 ती : बाय.
#समाप्त

(टीप : तो आणि ती कोण हे शोधण्यापेक्षा या संवादातील मुद्दे शोधून त्यावर विचार करूया !)

© विशाल विमल
--------------------------

भाग 2 : विवाह-कुटुंब संस्था आणि विवाहबाह्य संबंध

🔎 तो : तुला माझे रात्रीचे काय मुद्दे पटले आणि नाहीत. तुझे काय मत आहे. 
🔍 ती :  खरे तर तुझे विचार इतके मोकळे आहेत. त्यात लग्न ही गोष्ट कुठंच बसत नाही. कारण लग्न म्हटलं की कमिटमेंट आली. अर्थात तुझं मत चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो
🔎 तो : कमिटमेंट आहेच माझी. पण ती संसारिक जबाबदारीशी आहे. सहजीवनाशी कमिटमेंट आहे. कमिटमेंट ही पुढच्या व्यक्तीला द्यावयाच्या प्रेम, सुख आनंद याच्याशी आहे. या पलीकडे जाऊन मी मैत्री, प्रेम केले तर मी माझी संसारिक कमिटमेंट मोडली, असे होत नाही. 
मला इतके कळते की प्रेम, मैत्री या उदात्त आणि अमर्याद भावना आहेत. त्यांची पूर्ती एकाच ठिकाणी व्हावी आणि होतेच असे म्हणणे हे अनैसर्गिक मत आहे.  ती एकाच ठिकाणी झालीच पाहिजे हा अनाठायी आग्रह आहे. मात्र प्रेमपूर्ती एकाच ठिकाणी होत असेल तर छानच.
🔍 ती : प्रेमपूर्ती एकाच ठिकाणी होत नाही का ?
🔎 तो : प्रेम, मैत्री ही भावना जर उदात्त आणि व्यापक आहे तर ती कोणत्या एकाच व्यक्तीच्या बंधनात अडकून कधी पूर्ण होईलच असे नाही. एकाच वेळी अनेक व्यक्तींशी मैत्री, प्रेम होते. पहिल्यांदा एकाशी, मग एकाशी असेही होते. हे सर्व नैसर्गिक आहे. प्रेम, मैत्रीत एकचएक म्हटले की, त्या नात्यात खरे प्रेम, मैत्री किती आणि केवळ सोबत किती ? हा मोठा प्रश्न आहे. प्रेम, मैत्री या विविधांगी भावना आहेत. एका व्यक्तीकडून त्यातील काही भावनांची पूर्ती होईल तर दुसऱ्या व्यक्तीकडून इतर भावनांची पूर्ती होईल. एकच व्यक्ती सर्व भावनांची पूर्ती करण्यात कमी पडते आणि त्या व्यक्तीकडे भावनांची पूर्ती करच असा आग्रह धरणे हे अयोग्य आहे. उलट या प्रकाराने ज्या भावनांची पूर्ती होऊन दोघांना जे समाधान मिळते, तेही मिळण्यात अडथळे येऊ शकतात. त्यामुळे जिथे मिळेल तिथून मैत्री, प्रेम मिळवत रहावे. फुलपाखराप्रमाणे....
🔍 ती : पण कमिटमेंट एकनिष्ठ राहण्याशी सुद्धा असते ना. लग्न या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो जोडणं. अर्थात काया, वाचा मनाने एकमेकांशी आयुष्यभरासाठी एकरूप होणं. अर्थात ही अट नाही, अपेक्षा आहे. आणि ती अपवादात्मक परिस्थितीत लागू पडत नाही. ही कमिटमेंट निभावता येणार नसेल तर लग्नाची औपचारिकता तरी कशाला हवी? Live in चा पर्याय आहेच की. तोही उत्तम पर्याय आहे.
🔎 तो : एकनिष्ठतेशी व्याख्या काय ? आणि कोणतीही पूर्ती होत नसेल तरी एकनिष्ठ का रहायचे ? एकनिष्ठता ही शाश्वत, सुखद, समाधानकारक आणि निखळ आयुष्य जगण्याला बाधक आहे. एकूणच व्यक्ती स्वातंत्र्यालाही बाधक ठरू शकते. खरे तर संसार, लग्न या संस्था स्त्री शोषणाची मुळं आहेत. पुरुषसत्तेने बाईला गुलामीत ठेवण्यासाठी लग्न, संसार, सेक्स याला पावित्र्याचे, एकनिष्ठतेचे आवरण चढवले.
🔍 ती : जिथं खरंच प्रेम आहे, समजून घेणं आहे, तिथं शोषणाला थारा नसतो.
🔎 तो : तुझे असे म्हणणे असेल तर त्यानुसार आजच्या कुटुंब व्यवस्थेत शोषण न झालेल्या अत्यंत कमी व्यक्ती सापडतील. याचा अर्थ कुटुंब संस्थेत प्रेम नाही तर, शोषण आहे. बरोबर का ?
🔍 ती : शेवटी विवाह हे समाज एकसंध ठेवण्यासाठी निर्माण केलेले बंधन आहे. ज्याला ते मान्य असेल त्यानीच लग्न करावे, अन्यथा लग्नाच्या भानगडीत पडू नये. विवाह ही संकल्पना निर्माण होण्यापूर्वी स्त्री-पुरुष संबंध मुक्त होते. त्यात चुकीचं काही होते असे मी मानत नाही. पण जन्माला येणाऱ्या संततीची जबाबदारी कोणी घेईना. म्हणून विवाह ही संकल्पना अस्तित्वात आली. आणि ती मान्य असेल तर तिच्या अटी, शर्ती, नियम पण मान्य असायलाच हवेत. ज्याला ते मान्य नाहीत, त्याच्याकडे विवाह न करता मुक्त संबंध ठेवण्याचं स्वातंत्र्य आहेच.
🔎 तो : कुणी केले विवाहाचे नियम ? पुरुषांनी ना ? कुणाच्या हिताचे ? स्वतःच्या ना ? तरीही विवाह संस्था पवित्र आणि उदात्त कशी असू शकते. संततीच्या संगोपनासाठी विवाह आणि कुटुंब व्यवस्था अस्तित्वात आली, हे भर देऊन आज सांगितले जाते. पण त्याला तितकेच कारण नाही. आणि तितकेच कारण असेल तर मग बालसंगोपनात पुरुषांचा वाटा किती असतो ? की उलट गर्भधारणा, मासिक पाळी, बालसंगोपन आणि सेक्सच्या माध्यमातून स्त्रीला पुरुष स्वतःच्या नियंत्रणात ठेवतो. तिची पिळवणूक केली जाते. तिला काबूत ठेवले जाते. असे असेल तर समाज एकसंध ठेवण्यासाठी विवाह, कुटुंब व्यवस्था आवश्यक आहे, असे स्त्रीने का म्हणावे ?
🔍 ती : स्त्रीला नव्हती का या विवाह, कुटुंब व्यवस्थेची गरज ?
🔎 तो : असेलही. पण आज तीच संस्था स्त्रीच्या शोषणाचं मूळ बनली आहे. त्यामुळे आज तरी ही संस्था स्त्रीच्या हिताची दिसत नाही. बाळ हवं ही स्त्रीची नैसर्गिक गरज नाही. विवाहित स्त्रीला बाळ हवं ही समाजाने घडविलेली भावना आहे. त्यामुळे बाळ नको हे तिला नाकारता येते, पण कुटुंब व्यवस्थेत तो तिला अधिकार नाही. कारण पुरुषी सत्ता बळकट करण्यासाठी पुरुषांच्या मेंदूतून विवाह, कुटुंब संस्था उभी केली गेली. त्यातील पहिला भाग हा आहे की, पुरुषी सत्तेला तिच्या भविष्यासाठी पुत्र हवा होता, वारस हवा होता आणि याच काळात स्त्रीला बळाच्या जोरावर पुरुषाला स्वतःच्या काबूत ठेवता येऊ लागले. लैगिक गरज ही स्त्री वैयक्तिक पातळीवर पूर्ण करू शकते. जोडीदार हवा असेल तर तोही भेटतो, पूर्वीही भेटत होता. मग लग्नाची गरजच काय ? पण सेक्ससाठी लग्नाची गरज पुरुषांनी निर्माण केली. स्त्रीच्या लैगिकतेवर पुरुषांना वर्चस्वासाठी हवी तशी मालकी हवी होती आणि यातूनच कुटुंब, लग्न संस्था प्रस्थापित झाल्या आणि स्त्री शोषणाच्या मूळ बनल्या. याकडे खरे लक्ष दिले पाहिजे.
🔍 ती : लग्न, कुटुंब व्यवस्था मग उपयोगाची नाहीच का ? 
🔎 तो : माझं सुरुवातीपासून वाक्य आहे की, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि साथीदार व्यक्तीला समाधान देण्याची जबादारी पार पाडून मग जे करायचे ते करावे. खरे तर प्रत्येक नात्यात ही कमिटमेंट असते. संसार आणि लग्न संस्था स्त्रीवर लादण्यात आल्या. पुरुष आजही मुक्त आहे. संसाराचे नियम हे कोणत्या कायद्याने लिहिलेले नाहीत. त्यामुळे ते आज आपण कालसुसंगत ठेवू शकतो.
🔍 ती : असो. बोलू नंतर.
🔎 तो : होय. बाय.

(टीप : तो आणि ती कोण हे शोधण्यापेक्षा या संवादातील मुद्दे शोधून त्यावर विचार करूया !)

© विशाल विमल
--------------------

प्रेम, प्रेमातील बंदीस्थपणा आणि विवाहबाह्य प्रेमसंबंध (भाग : 1)

● तो : प्रेमात पड, म्हणजे प्रेम कविता सुचतील.
◆ ती : पडून, आपटून झालंय. आता नको परत.
● तो :  ते तुमचं प्रेम होतं,  अस मला तरी वाटत नाही.
आणि प्रेम एकदाच, एकाच व्यक्तीवर होते ही अंधश्रद्धा आहे.
◆ ती : परत तितक्या intensity नं कोणी आवडलंच नाही. तुलना होते नुसती.
● तो : तुलना केली की मग अवघडच. वेगवेगळे गुण, दुर्गुण असतात प्रत्येक व्यक्तीत. मला आता कुणी आवडले तरी मी करेल प्रेम. 
◆ ती : बायको झोडपेल नं चांगली.
● तो : नाही, हा व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे. 
◆ ती : असेलही स्वातंत्र्य. पण आपल्या आयुष्याचा जोडीदार वाटून घेण्याएव्हढं मन मोठं नसतं कोणाचंच. म्हणजे असूया निर्माण होतेच मनात.
● तो : नवरा बायको म्हणजे एकमेकांच्या वस्तू नाहीत.
इतरांनी कुणी घ्यायच्या नाही किंवा इतरांकडे जायचं नाही.
--------
● तो : प्रेम, मैत्री, सेक्स या उदात्त भावना आहेत. त्या अमर्याद आहे. समजा, नवराबायको हे कौटुंबिक जबाबदाऱ्या,  शारीरिक, भावनिक गरजा एकमेकांच्या पूर्ण करत असतील आणि अजून अन्य ठिकाणी त्यांचे संबंध प्रस्थापित झाले तर त्यात गैर काय आहे.
◆ ती : असं बोलणं सोपं आहे. प्रत्यक्षात करणं कठीण आहे.
● तो : होय, म्हणून तर सांगतो, असे वागायला खूप प्रगल्भता लागते. 
◆ ती : तू बायकोला सांगू शकशील की माझे दुसऱ्या कोणाशी संबंध आहेत? आणि ती स्वीकारू शकेल हे? आणि तिनं असं केलं तर तू स्वीकारू शकशील?
● तो : आजवर तर बोलण्याच्या पातळीवर वैयक्तिक आणि जाहीर व्यासपीठावर अशी मांडणी दोघांनी करत, हे मान्य केले आहे. जगण्याच्या पातळीवर अवघड नाही. आणि मी तिला अडविणारा कोण ? आणि तिने दुसरे कुणावर प्रेम केले तर ती माझे काय हिरावून नेत आहे ? माझी बायको म्हणून ती संसारिक जबाबदाऱ्या सांभाळते, त्यापलीकडे तिचे व्यक्ती स्वातंत्र्य आहे. मी कोण तिला अडविणारा ?
◆ ती : मन तयार तरी होईल का असं करायला? आनंद तरी वाटेल का मनाला?
● तो : आपल्यावर एकेरी आणि बंदीस्थ संस्कार झाले आहेत. उदात्त संस्कार झाले नाहीत. प्रेम ही भावनाच उदात्त आहे. आई, वडील, भाऊ बहीण यांच्यावर प्रेम करताना नाही हा प्रश्न पडत ? मित्र - मैत्रिणी, प्रियेसी - प्रियकर येथे का हा प्रश्न पडतो ?  कारण या प्रेमात लैंगिकतेचा विचार केला जातो. आणि आपल्याकडे लैंगिकतेमध्ये बंदीस्थपणा आणून ठेवला आहे. नॉर्मल विचारच केला जात नाही. खरे तर सेक्सशिवाय मैत्री, प्रेम असे नाते छान तयार होते. पण आपल्याकडे सेक्श म्हणजेच मैत्री प्रेम समजले जाते आणि त्यामुळे खूप बंधने लादली जातात मैत्री प्रेम यावर.....
◆ ती : आपल्या जोडीदारकडून सगळ्या गरजा पूर्ण होत असतील तर आपण इकडे तिकडे का जाऊ?
● तो : खरे तर गरज ही नुसती गरज नाही. प्रेम, मैत्री या उदात्त आणि अमर्याद भावना आहेत. त्या एकाच व्यक्तीकडून पूर्ण होतील हे कुणी सांगितले ?
-----------
◆ ती :  मला ती आपल्या जोडीदाराशी केलेली बेईमानी वाटेल. पण तो सक्षम नसेल तर मी जाईन कदाचित दुसरीकडे. कारण आपल्या इच्छा दडपून टाकणं ही स्वतःशी बेईमानी ठरेल.
● तो : हा तुझा विचार फक्त लैगिकतेबाबत आहे. मी तो सोडून मैत्री, प्रेम याचा विचार मांडतोय. मैत्री, प्रेम करण्यात काय गैर आहे. खरे तर सेक्स करण्यात ही काही गैर नाही. पण हा मुद्दा नंतर बोलू.
◆ ती : प्रेम आहे म्हणून शरीर द्यावंसं वाटणं हे सहज आहे. तुला जर कुणाबद्दल प्रेम वाटलं तर तू बायकोला सांगू शकशील मोकळेपणाने?
● तो : 1 लाख 1 टक्के सांगेन. पण तिला सांगायची अथवा तिच्या परवानगीची गरज काय ? असाही माझा प्रश्न आहे
◆ ती : तू सांगेन म्हणतो, पण इतका मोकळा विचार फार कमी लोक करू शकतील. पण तुझा जो दुसरा प्रश्न आहे, त्याबाबत मला असे वाटते की तिला सांगण्याऐवढा मोकळेपणा आणि विश्वास हवा तुमच्या नात्यात?
● तो : पण मला सांग, बायकोला का सांगायचे ? ते माझे व्यक्ती स्वातंत्र्य आहे ना ? मग मी का सांगायचे ? मी तिच्या बाबतच्या सर्व गोष्टी पूर्ण करतो, तर मग मी तिला त्या पलीकडचे का सांगायचे ? लग्नाअगोदर आपण कुणाशी प्रेम केले, सेक्स केले हे आई-वडील आणि होणाऱ्या बायकोला- नवऱ्याला सांगतो का ?
● तो : समजा एखादी स्त्रीच्या प्रेम मैत्री याबाबतच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत. मी वर बोललो तसे. पण त्या स्त्रीच्या नवऱ्याच्या नसतील तर त्या स्त्रीने बाहेर कुणावर प्रेम, मैत्री करायची नाही का ? मग त्या पत्नीचे व्यक्ती स्वातंत्र्य कुठे गेले ?
◆ ती :  शरीर, मन, आयुष्य हे सगळं share करतोच की आपण आपल्या जोडीदाराशी.
● तो: पण आपल्या शरीर, मन, आयुष्यावर मालकी नसते जोडीदाराची.
◆ ती : मालकी नसतेच त्याची. तो गाजवत नसेलही. पण आपल्याला त्यालाच मालकी द्यावीशी वाटत असेल तर?
● तो : म्हणून तर मी म्हटलो की, आपल्याकडे संस्कार आहे. तो हाच संस्कार की लग्न म्हणजे पती-पत्नी एकमेकांचे मालक
◆ ती : नाही रे. ती प्रेमाची मालकी असते. आपण स्वतःहून देऊ केलेली. त्यासाठी कोणी आपल्यावर जबरदस्ती करत नाही.
● तो : हा हा हा...त्याला मानसिक गुलामी म्हणतात. प्रेम किती आणि भावना, शरिरावर नियंत्रण अर्थात मालकी किती हे पहा. नवराबायकोत प्रेमाची मालकी असती ना तर प्रेमाची अशी असंख्य उदाहरणे सापडली असती. पण नवराबायकोच्या प्रेमाची उदाहरणे फार नाही. याचा अर्थ त्या नात्यात फार प्रेम नसते. असते ती बहुतांशी शारीरिक मालकी आणि लग्नाची गाठ.
◆ ती : असेलही. जाऊ दे, मी झोपतीये
● तो : जाऊ दे म्हणजे ?
◆ ती : झोप फार आलेली. म्हणून म्हटलं रे.
● तो : मला वाटले की तुझी चिडचिड झाली.
◆ ती : नाही नाही.
● तो : Gn
◆ ती : Gn

(टीप : तो आणि ती कोण हे शोधण्यापेक्षा या संवादातील मुद्दे शोधून त्यावर विचार करूया !)

© विशाल विमल
________________

Friday, 17 July 2020

पुरुषीवर्चस्व आणि कामपूर्तीचे समाधान

शरीरसंबंधांमध्ये आजही पुरुषांची मक्तेदारी असल्यासारखे त्यांचे वर्तन आहे. त्यामुळे आजही अनेक ठिकाणी स्त्रीने शरीरसंबंधांमध्ये स्वतः हुन फार काहीही करायचे नाही, असा अलिखित नियम आहे. जे करायचे ते पुरुषाने स्वतः आणि स्वतःला वाटेल तसे करायचे. मात्र हे पूर्णतः चूक आहे. शरीरसंबंधांला संभोग असा अर्थपूर्ण शब्द आहे. शरीरसंबंधांमध्ये स्त्रीपुरुषांचा समान सहभाग असावा, असा त्यातून अर्थ सूचित होतो. त्यामुळे शरीरसंबंधात स्त्रीपुरुष दोघांचाही समान सहभाग असेल तर पुरुषासह स्त्रीचीही कामपूर्ती समाधानकारक होऊ शकते. शरीरसंबंध ठेवताना काही प्रकारांमध्ये स्त्रियांना थोडा पुढाकार घ्यावा लागतो, ते प्रकार पुरुषांनी माहीत करून घेऊन महिलांचाही शरीरसंबंधामध्ये सहभाग वाढवला पाहिजे. बाईने शरीरसंबंधामध्ये सहभाग, पुढाकार घेतला म्हणजे 'ती बाई नीट चालीची नाही', असा चुकीचा गैरसमज करून घेण्याची अजिबात गरज नाही. खरे तर स्त्रीपुरुष शरीरसंबंधांमध्ये स्त्रीचाही सहभाग असणे हे आवश्यक आहे आणि ती स्त्रीची गरजही आहे. तसेच प्रत्यक्ष शरीरसंबंध करण्याअगोदर पुरुषांनी प्रणय केल्यास स्त्रीही उद्दीपित होते. त्यामुळे ती शरीरसंबंधांत सहभागी होऊन पुरुषांच्या कामपूर्तीचे समाधान वाढू शकते आणि तिलाही समाधान मिळते.  

पुरुषांच्या एकूणच कामपूर्तीमध्ये स्त्रीचा सहभाग, पुढाकार महत्वाचा आहे. पुरुषी वर्चस्वासाठी स्त्रीचा सहभाग, पुढाकार नाकारला जाणार असेल तर पुरुषांना कामपूर्तीच्या समाधानालाही मुखावे लागत आहे, हे पुरुष कधी लक्षात घेणार आहेत ? पिढ्यांपिढ्या पुरुषांच्या शरिरसंबंधाच्या मक्तेदारीमुळे तेही कामपूर्तीचे समाधान पुरेपूर घेऊ शकले नाहीत. आणि त्या संबंधात असलेली स्त्री वा अन्य जोडीदारही समाधान घेऊ शकले नाही. त्यामुळे शरीरसंबंधातून मिळणाऱ्या कामपूर्तीच्या समाधानाला संपूर्ण समाजच मुकलेला आहे, हे वास्तव नाकारून चालणार नाही. 

जोपर्यंत स्त्रीला मुक्तपद्धतीने, संकोच न करता वावरण्याचा अधिकार या समाजात दिला जात नाही, तोपर्यंत तीही फुलणार नाही. त्यासाठी स्त्रीला मुक्त आणि निःसंकोचपणे जगू दिले पाहिजे. या निःसंकोचपणे जगण्यातूनच ती शरीरसंबंधांमध्ये पुढाकार घेण्यास तयार होणार आहे. मात्र आजवर स्त्रीच्या लैंगिकतेचा आणि तिच्या निःसंकोचपणे जगण्याचा कधी या पुरुषी व्यवस्थेने विचारच केला नाही. त्यामुळे ती दुसर्‍यालाही जो काही आनंद देऊ शकते, त्या आनंदाला पुरुषही हजारो वर्ष इथल्या खुळ्या कल्पना, रूढी परंपरामुळे मुकला आहे. हजारो वर्ष स्त्रीला पुरुषी वर्चस्वाने दाबल्यामुळे आणि चुकीच्या रूढी-परंपरांमुळे ती या आनंदापासून स्वतः मुखत आली आहे. 

तिच्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे. उत्साह आहे. संभोग सुख देण्याची ताकत आहे, हे खास करून पुरुषांनी लक्षात घेण्याची गरज आहे. शरीर सुखाची संकल्पना फक्त लिंगाभोवती नाही अथवा फक्त लिंगातूनच पूर्ण होते असे नव्हे. केवळ त्यातून पूर्ण कामपूर्तीचा आनंद मिळतो असेही नाही. कामपूर्तीमध्ये स्त्रिच्या इतरही अवयवांना महत्व आहे. त्यातून होणारी कामपूर्ती ही तिला सुख देते, सुखावते. ती आनंदी नसल्यास तुमच्या सोबत ती फक्त जबरदस्तीने सहभागी होत आहे, हे लक्षात घ्यावे. आणि त्यातून मिळणारा कामपूर्तीचा आनंद हा खराखुरा नाही, हेही आता तरी तपासून पहावे.  खरा आनंद उपभोगायचा असेल तर दोघांनी एकमेकांचा आदर करत, एकमेकांच्या मनाला आणि शरिराला समजून घेऊन, एकरूप व्हावे लागेल. आणि मग त्या परमोच्य सुखाच्या आनंदाचा उपभोग मिळेल.
तो दहा पटीने जास्त असेल. दोघांचे कामजीवन उत्साही, आनंदी राहून परिणामी संपूर्ण कुटुंब आनंदात जगेल. 

कामपूर्तीच्या असमाधानामध्ये शास्त्रीय माहितीचा जसा अभाव कारणीभूत आहे, तसेच काही सामाजिक आणि पुरुषसत्ताकतेतील कारणेही अडसर आहेत. तो अडसर स्पष्ट करण्याच्या हेतूने हा लेख लिहिला आहे. सेक्शुअल एज्युकेशन' नावाने सुरू असलेल्या व्हॉट्सअप ग्रुप गेल्या आठवड्यात "स्त्री, पुरुष यांची कामपूर्ती" या विषयावर चर्चा झाली. तो व्हॉट्स ग्रुप परिवर्तनवादी चळवळीतील नचिकेत कोळपकर, रुपाली जाधव, विशाल विमल, मुक्ती साधना या साथींनी सुरू केला आहे. त्यात सर्वाधिक मुलंमुली आणि सर्वच क्षेत्रातील, सर्व वयोगटातील व्यक्ती आहेत. लैंगिकतेबाबत सर्व गोष्टींची शास्त्रीय माहिती देणे आणि लैंगिकतेसंबंधी समाजात निकोप दृष्टिकोन कसा पसरवता येईल यासाठी प्रयत्न करणे, हा या ग्रुपचा उद्देश आहे.

© विशाल विमल
© रुपाली जाधव

हस्तमैथून ही स्त्रियांची निकोप गरज : पुढे काय ?

लैंगिकतेबाबत सर्व गोष्टींची शास्त्रीय माहिती देणे आणि लैंगिकतेसंबंधी समाजात निकोप दृष्टिकोन कसा पसरवता येईल यासाठी प्रयत्न करणे, या उद्देशाने सेक्शुलिटी एज्युकेशन नावाने आम्ही परिवर्तनवादी चळवळीतील साथींनी एक व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला आहे. गेल्या आठवड्यात 'स्त्रियांचे हस्तमैथुन' या विषयावर ग्रुपमध्ये चर्चा झाली. खरे तर ग्रुपवर कोणते प्रश्न विचारले आणि त्याला काय उत्तरं दिली, हे खूपच इंटरेस्टींग आहे. एक मात्र खरे की स्त्रियांनी हस्तमैथुन करणे योग्य आहे. त्याला शास्त्रीय आधार आहे. ती त्यांची नैसर्गिक गरज आहे, आणि हस्तमैथुनाबाबतचे समाजात गैरसमज देखील आहेत, आदी निरीक्षणे चर्चेतून समोर आली आली.   

स्त्रियांनी हस्तमैथून करणे योग्य आहे, अशी भूमिका असणाऱ्या लोकांकडे मी या विषयासंबंधाने एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. त्यांच्याबाबत मला काही बोलायचे आहे आणि त्यांच्याकडून मला काही अपेक्षाही व्यक्त करायच्या आहेत. स्त्रियांचे हस्तमैथुन ही निकोप गरज आहे, तर मग हा विषय सामाजिक स्तरावर पुढे गेला पाहिजे का ? तर याचे उत्तर होय असे आहे आणि ते काम स्त्रियांनी हस्तमैथून करणे योग्य आहे, असे म्हणणाऱ्यांना धाडसाने करावे लागणार आहे. मात्र हा विषय कसा पुढे घेऊन जायचा ? त्याची चर्चा कशी घडवून आणायची ? आणि सामाजिक स्तरावर हा विषय जाहीर चर्चिला जाण्याची गरज काय आहे ? याचा विचार करून पुढे जावे लागणार आहे. एक मात्र खरे की या विषयाची निश्चितपणे आणि सातत्यपूर्ण जाहीर चर्चा होण्याची गरज आहे, यात अजिबात शंका नाही.

माहिती आहे, आता पुढे काय ?
1) लैंगिकता या विषयावर बोलताना आणि इतरांचे ऐकता जर आपण शास्त्रीय शब्दांचा वापर केला तर आपल्याला आणि पुढच्याला फारसा संकोच वाटत नाही. खरे तर लैंगिक विषयावर बोलायचे कसे याची सुरुवात भाषेपासून होते. त्यामुळे शास्त्रीय भाषा वापरून स्त्रियांचे हस्तमैथुन हा विषयदेखील आपण कुटुंबतील सदस्य, नातेवाईक, मित्रपरिवार येथे आपल्याला बोलायला स्पेस आहे, हे ओळखून तिथे आपण बोलू शकतो. याबाबत कुणाचे काही प्रश्न असतील तर त्यांना शक्य तेवढी शास्त्रीय उत्तरे देऊ शकतो. आजवर आपण या विषयावर जर बोलला नसाल तर यापुढे आपण बोलण्याचे धाडस केले पाहिजे. 
2) आपल्यातील अनेकांना मी लैंगिक विषयातील प्रचारक समजतो. त्यामुळे संधी मिळेल तिथे सामाजिक विचारपीठावर मैथुनासंबंधी विषय निघाल्यास तिथे व्यक्त झाले पाहिजे. एकूणच लैंगिकता या विषयावर सामाजिक विचारपीठावर बोलणे टाळले जाते. कारण की, लैंगिकतेचा संबंध चारित्र्याशी लावला जातो. म्हणजे उघडउघड लैंगिकतेबाबत बोलणाऱ्या व्यक्तीकडे या व्यक्तीचे चारित्र्य कसे असेल ? या नजरेने पाहिले जात असल्याने सामाजिक क्षेत्रातील भलेभले लोक लैंगिकता या विषयावर बोलणे टाळतात. मैथुन हा विषय तर थेट कामजीवनाशी निगडित असल्याने त्यावर बोलणे धाडसाचे ठरणार आहे. पण हे धाडस आपल्याला करावे लागणार आहे आणि आपल्याकडे शास्त्रीय माहिती आणि शास्त्रीय शब्द असल्याने फार घाबरण्याची आवश्यकता नाही. जोवर हा विषय सामाजिक विचारपीठांवर मांडला जाणार नाही, तोवर या विषयाभोवतीची बंधने तुटणार नाही आणि हे काम आपल्याला करावे लागणार आहे. खरे तर हस्तमैथुनाबाबतची शिल्प ही खजुरा लेणी आणि अन्य अनेक ठिकाणी सापडतात. याचा अर्थ हा विषय झाकून ठेवण्याचा अजिबात नाही. 
3) आपण हस्तमैथुनाकडे शास्त्रीय आणि निकोप दृष्टिकोणाने पाहत असल्याने आपल्या आजूबाजूच्या स्त्रियांच्या हस्तमैथूनाकडेही आपण असेच पाहणार आहोत. अत्यंत जवळच्या स्त्रियांना लागणारी हस्तमैथुनाबाबतची माहिती पुरविण्यापासून ते त्यांना इतरांची वाटत असणारी भीती घालविण्यासाठी मदत करणे, आदी गोष्टी आपण करू शकतो.
4)  समाजात आजही स्त्रियांची लैंगिकता अर्थात कामजीवन नियंत्रित करून जातव्यवस्था आणि पुरुषव्यवस्था उभी आहे. हस्तमैथून हा कामजीवनाचा भाग आहे, हे आपण मान्य केले आहे. त्यामुळे हस्तमैथुनातून स्त्री जर स्वतः कामजीवनाचा आनंद घेऊ शकली तर काही प्रमाणात तरी स्त्रीयांच्या लैंगिकतेचे नियंत्रण ढिले होऊ शकते. त्यादृष्टीने स्त्रियांच्या हस्तमैथुनकडे पाहता येईल. खरे तर काही पुरुषांना स्त्रियांच्या हस्तमैथुनाबाबत भीती आहे की, जर स्त्रिया त्यांची लैंगिकता हस्तमैथुनामधून पूर्ण करतील, तर आमचे काही महत्त्व राहील की नाही ? आणि लैंगिकदृष्ट्या पण स्त्रिया इंडिपेंडेंट होतील की काय ? याची भीती काही पुरुषांना आहे. पण शेवटी पुरुषांना वाटणारी ही भीती निराधार आहे. लैंगिकतेबाबत असणारा पुरुषांचा दृष्टिकोन सुधारला आणि त्यांचे पुरुषी वर्चस्व त्यांनी कमी करून स्त्रियांशी जर सुसंवाद करण्याची आणि तिच्या एकूण स्वातंत्र्याची दखल घेतली तर पुरुषांना घाबरण्याची गरज नाही. आणि स्त्रियांकडे जसा हस्तमैथून हा पर्याय आहे तसा तो पुरुषांकडेही आहे. 
5) लैंगिक शिक्षण हा विषय शालेय अभ्यासक्रमात येईल तेव्हा पाहू, पण किमान सध्या शालेय अभ्यासात जो थोडा काही भाग आहे, त्याबद्दल शिक्षक मुलांना शिकवतात का ? याकडे कुटुंबातील सदस्य वा पालक म्हणून आपण लक्ष ठेवू शकतो. 
6) बुवाबाबा, फकीर, अम्मा आणि धर्माचे ठेकेदार जर हस्तमैथुन हा विषय धर्माच्या, पवित्र्याच्या, योनीसुचितेच्या नावाखाली झाकून ठेवत असतील. तर आपण शास्त्रीय माहिती देऊन तो उकरायचा. 

© विशाल विमल
© रुपाली जाधव

कळीचे फुल होताना मनात प्रश्नांची गर्दी

● शाळा, सोशल मीडिया, पालकांकडे उत्तरे आहेत का ? 
                                                  © विशाल विमल
अर्भक ते कुमारवयीन टप्प्यापर्यंत मुलामुलींच्या वाढीकडे पालकांचे लक्ष तरी असते. पण साधारण वयवर्षे 10 ते 20 या किशोरवयीन मुलामुलींकडे शिक्षकांचे, पालकांचे, दादाताईंचे, नातेवाईकांचे खरचं लक्ष असते का ? म्हणायला लक्ष असेलही पण त्या वयाच्या मुलामुलींशी त्यांच्या प्रश्नासंबंधी चर्चा, संवाद होतो का ? तर याचे उत्तर नाही असे आहे. कारण कुमारवयीन अवस्थेतून किशोरवयीन अवस्थेत प्रवेश करताना मुलामुलींमध्ये होणारे बदल हे लैंगिकतेशी निगडित असतात आणि आपल्याकडे नियम असा आहे की, लैंगिकतेवर बोलणे म्हणजे घाण, वाईट, लज्जास्पद आहे. त्यामुळे हा विषय जेवढा दाबून ठेवता येईल तेवढा सर्वजण दाबून ठेवतात. पण हा विषय असा आहे की, तो जेवढा फुग्यासारखा खाली दाबून ठेवला जातो, तो तितका वर उसळी मारतो. या वयात मुलामुलींच्या लैंगिक अवयवात, आवाजात, शरीररचनेत, दिसण्यात बदल होतात. मनात वेगवेगळ्या भावना निर्माण होतात. मूड बदलतात. दुसऱ्या व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होते, प्रेमाची भावना तीव्र होते. मनात गोंधळ असतो, गडबड असते, चीडचीड असते, तसा आनंद असतो, उत्साह असतो, उर्मी असते. विशेष म्हणजे या सर्वच्यासर्व गोष्टी नैसर्गिक आणि योग्य असतात. पण हे सर्व नक्की का घडत आहे ? हे सर्व सांगायला, आधार द्यायला, मनमोकळं करायला या मुलामुलींच्या जवळ कुणीही नसते. अशा विषयांवर शाळेतही बोलले जात नाही. अभ्यासात लैंगिकतेबाबत एखादा मुद्दा असेलच तर शिक्षक तो सोडून पुढचा मुद्दा शिकवतात. आपल्याकडे अशा विषयांवर घरात बोलणे, हे पाप समजले जाते. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत तर आणखी संभ्रमात पाडणारी माहिती उपलब्ध करून दिले जाते. मग या कळ्यांचे फुलांमध्ये रूपांतर होताना त्यांच्या मनात गर्दी केलेल्या प्रश्नांना उत्तरे कोण देणार आहे ? यापुढील काळात शाळा, पालक, सोशल मीडिया याची उत्तरे देतील अशी अपेक्षा ठेवूयात. 

आज या विषयावर लिहिण्याचे कारण म्हणजे परिवर्तनवादी चळवळीतील आम्ही साथींनी 'सेक्शुअल एज्युकेशन' नावाने व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला आहे. 'वयात येताना सर्व लैंगिक वैविध्य असणाऱ्या व्यक्तींमध्ये होणारे शारीरिक, मानसिक बदल' या विषयावर ग्रुपमध्ये गेल्या आठवड्यात चर्चा झाली. याविषयाच्या निमित्ताने ग्रुपमध्ये जे प्रश्न उपस्थित झाले, त्याला तिथे तज्ञ व्यक्तींनी उत्तरे दिली आहेत. पण ते प्रश्न केवळ ग्रुप पुरते मर्यादित नाहीत. सर्वांनीच त्या प्रश्नांकडे बारकाईने पाहिले पाहिजे. उपस्थित झालेले प्रश्न वाचून त्यावर आपल्याकडे उत्तरे आहेत का ? आणि असतील तर ती या वयातील मुलामुलींना कशी समजावून द्यायची, त्यामुलामुलींना कसे समजावून घ्यायचे, याचाही विचार प्रत्येकाकडून व्हायला हवा. आपल्याकडे उत्तरे नसतील तर मग काय करायचे, याचाही विचार व्हावा. 

निरागस प्रश्नांची गर्दी
मुले- मुली वयाच्या कितव्या वर्षांपासून वयात येण्यास सुरुवात होते?, त्यांच्यात शारिरीक व मानसिक बदल होण्यास किती वेळ लागतो?, दुसऱ्या व्यक्तीबद्दल आकर्षण कधी निर्माण होण्यास सुरुवात होते. मुलंमुलिंच्या मानसिक, शारीरिक बदलांमध्ये काही फरक असतो का? त्यांच्यामध्ये सेक्सच्या भावनांची सूरवात कूठल्या वयापासून  होते? वयात येताना शिश्न किंवा योनी भोवती केस वाढतात, अशावेळी स्वच्छतेच्याबाबतीत मार्गदर्शन करावे. कोणत्या वयात सेक्सची सुरवात करणे योग्य आहे. गूप्तांगावर कूठल्या वयात केस येण्यास सूरवात होते. पुरुष साधारण वयाच्या किती वयापर्यंत सेक्शुअल लाईफमध्ये परिपक्व होतो. वयात येणाऱ्या पाल्यांशी पालकांचा संवाद कसा असावा. एका ठराविक वयात पुरुषांच्या निप्पलमध्ये दोन्ही बाजूला हलकीशी गाठ येते आणि आपोआप निघून पण जाते. तर याचा आणि वयात येण्याचा काही संबंध असतो का? शालेय शिक्षणात कोणत्या इयत्तेपासून लैंगिक शिक्षण दिले गेले पहिजे. वयात येणाऱ्या मुलामुलींच्या आईवडिलांची जबाबदारी काय असावी? मुलगा वयात येत असताना जसा टेस्टेस्टेरॉन नावाचा हार्मोन शरीरामध्ये बदल घडवून आणत असतो, तर हा हार्मोस नंतर एक्सटर्नल काही सप्लिमेंट्स अथवा आयुर्वेदिक पद्धतीने वाढवता येतो का ?  येत असेल तर त्याचे फायदे-तोटे सांगा. मुलगा वयात येत असताना आईवडिलांनी कसं वागलं पाहिजे. वयात आल्यावर पाहिलं प्रेम होते, एखादी व्यक्ती आवडू लागते, पण सेक्स किंवा इतर काही करण्याची उत्तेजना होत नाही. त्या व्यक्तीला डोळ्यांनी पाहून मनाचे समाधान आणि आनंद होतो. तिथे सेक्स आणि इतर काही करण्याच्या उत्तेजन का होत नाहीत. वयात येताना मुलामुलींवर हार्मोसचे कसे परिणाम होतात. आपल्याकडे लग्नाचे वय मुलींचे 18 आणि मुलांचे 21 वर्ष किमान असावे लागते. हेच निर्बंध परदेशांमध्ये का नाहीत. पूर्वी मुली वयवर्षे 16 नंतर वयात यायच्या, आता वयाच्या 11, 12 व्या वर्षीच यायला लागल्या आहेत, याचे कारण काय आहे. वयात येण्याचा आणि आवाजात बदल होण्याचा काय संबंध आहे. मुलीच्या पहिल्या पाळीच्या वेळी गोडाचे जेवण का करतात. मुलंमुली वयात आल्यावर घरातील वातावरण कसे असावे. वयात येण्याची सुरुवात काहींमध्ये लवकर आणि काहींमध्ये उशीरा होण्याचे परिणाम आणि कारणे काय आहेत. वयात आल्यानंतर पाळी झाल्यावर मंदिर प्रवेश का नाकारला जातो? जे समलिंगी, तृतीयपंथी आहेत त्यांच्यात वयात येताना कोणते शारीरिक व मानसिक बदल होतात? वयात येताना तारुण्यपीटिका आणि शरीराचा वास का येतो.  काहींचे लिंग स्त्री की पुरुष हे निश्चित होत नाहीत, अशा मुलामुलींच्या काय भावना असतात. वयात येताना आगाऊपणा वाढतो का ? समाजाची बंधने नियम, कायदे-कानून मी का पाळू, मला पाहिजे तसे मी जगणार, अशी भावना का निर्माण होते. कधीकधी आईवडील सुद्धा दुश्मन वाटायला का लागतात, असे सर्वांच्या बाबतीत होते का ? एका बाजूला अकरावी, बारावी, करिअर्सचे टेन्शन आणि दुसऱ्या बाजूला वयात येतानाचे प्रचंड शारीरिक आकर्षण, असे सर्वांच्या बाबतीत होते का ? नुकत्याच वयात येणाऱ्या बहुतांश पोरांना आपल्यापेक्षा वयाने दुप्पट वयाच्या स्त्रिया आवडायला लागतात. याची काही सायकोलॉजिकल कारणे असावीत का? मुली वयात आल्यावर प्रथम संभोगाच्या वेळेस कोणत्या शारिरिक मर्यादा असाव्यात किंवा कश्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे..? लिंगाच्या आतील भागास रोज साबण लावून धुतले तर कोरडेपणा निर्माण होणार नाही का? मी ऐके ठिकाणी वाचले होते की लिंगाच्या कातडी आतील भाग केवळ पाण्याने धुवावा, साबण लावू नये. जे तृतीयपंथी असतात त्यांचे स्तन आणि योनी कशा प्रकारच्या असतात. कारण की त्यांनी ऑपरेशन केलं तर ते सक्सेस होतं का?
हे सारे प्रश्न वयात येणाऱ्या कोवळ्या कळ्यांच्या मनातील आहेत. याची उत्तरे आपल्याकडे आहेत का ? त्याची उत्तरे आपण या मुलामुलींना कशी देणार आहोत ?

(सेक्शुअल एज्युकेशन' नावाने व्हॉट्सअप ग्रुप नचिकेत कोळपकर, रुपाली जाधव, विशाल विमल, स्वप्नील मानव, मुक्ती साधना हे साथी चालवतात)

© विशाल विमल, पुणे

मी बारावीत नापास, बसलो तीनदा

© विशाल विमल
बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागला. जे पास झाले त्यांचे अभिनंदन ! जे नापास झाले त्यांचा मी सख्खा मित्र आहे. त्यामुळे त्यांना शिव्या-शाप देणे, त्यांना नावे ठेवण्याचे काम मी करू शकत नाही आणि तो माझा स्वभावही नाही. मी लिहिणार आहे, त्यावर माझे परिचित कुणी फारसे विश्वास ठेवणार नाही, पण प्रामाणिकपणे सांगतो की, मी बारावीत नापास झालो होतो आणि दोनदा नव्हे तर तीनदा बारावीच्या वर्गात बसलो आहे. तेही आर्ट्स - कला शाखा. सायन्स - विज्ञान शाखेत बारावीला असतो तर आजवर तरी मी बारावीतून पुढे सरकलो नसतो, हे मी खात्रीपूर्वक सांगतो.

मला मराठी लिहिता, वाचता येत नव्हते म्हणून मी सहावीत पहिल्यांदा नापास झालो. कुणाला वाटेल की, मी इंग्लिश मेडियमला असेल म्हणून मला मराठी वाचता, लिहिता येत नसेल, पण तसे नव्हे. मी मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषदेच्या आणि रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत शिकलो आहे. पुढेही माझे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातूनच झाले आहे. मात्र मला मराठी वाचता, लिहिता येत नसतानाही मी सहावीपर्यंत कसा आलो, हे गुरुजी आणि शिक्षकांना माहीत असेल, मला मात्र त्याबद्दल काहीच माहीत नाही. माझ्यासारख्या विद्यार्थ्याला जेथे सहावीपर्यंत मराठी वाचायला, लिहायला येत नव्हते, तिथे इंग्लिश येत असेल असा विश्वास बाळगणेच इनव्हॅलीड आहे. मी नापास झाल्यावर पुन्हा शाळा सुरू होण्याअगोदर तोडकेमोडके मराठी लिहायला वाचायला शिकलो आणि पुन्हा सहावीच्या वर्गात जाऊन बसलो.

 शाळेत मराठी, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, गणित आदी मराठी भाषेतून 4-5 विषय असतात. मराठी भाषेला जवळचा असलेला हिंदी एक विषय आहे. आणि इंग्लिशमधुन एकच विषय असतो. त्यामुळे 4-5 विषयांच्या दृष्टीने मला मराठी भाषा वाचायला, लिहायला आली, हे माझ्यासाठी खूपच महत्वाचे होते. पण खरी गंमत पुढे सुरू झाली. पहिली ते पाचवीपर्यंत काय शिकविले यातले माझ्या डोक्यात काहीच गेले नसल्याने माझी पाटी कोरी होती. त्यामुळे वाचता, लिहिता येत असूनही शिक्षक शिकवत असलेला धडा-प्रकरण समजून घ्यायला मला अवघड जात होते. शिक्षक शिकवत असलेल्या भागाचा, काही भाग अगोदरच्या इयत्तेत शिकविला असल्याने आता शिक्षक काय शिकवत आहेत, ते समजून घ्यायला डोक्याला ताण द्यावा लागायचा आणि तो मी द्यायचोही. एक मात्र खरे की, मराठी भाषेशीसंबंधित 4-5 विषयांसाठी मला इतका प्रयास करावा लागत होता. त्यामुळे मला इंग्लिशकडे लक्ष देण्याची इच्छाच कशी होईल? आणि ती झालीही नाही. त्यामुळे अकरावीपर्यंत 35, 36 गुण मिळून मी इंग्रजीत पास होत बारावीपर्यंत आलो. अर्थात सहावीपर्यंत मला मराठी लिहिता, वाचता येत नसतानाही मी तिथवर आलो होतो, तसेच इंग्रजी लिहिता, वाचता येत नसतानाही मी बारावीपर्यंत आलो होतो. ते कसा आलो हे शिक्षकांना माहीत. मात्र बारावीपर्यंत मराठी माझे छान झाले होते. बऱ्यापैकी वैचारिक वाचन मी केले होते. भाषण स्पर्धांमध्ये मी क्रमांक मिळवत होतो, इतके मराठीतील बोलणे माझे ठीकठाक झाले होते. गावातील, तालुक्यातील काही सामाजिक उपक्रमात असायचो. नियतकालिकात मोडकेतोडके लेखन करू लागलो होतो. कॉलेजच्या सांस्कृतिक, लेखन विभागात सहभागी व्हायचो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अपत्य असलेल्या विवेक वाहिनी विभागाचा संघटक म्हणून कॉलेजात काम करायचो. मात्र इंग्रजी लिहिता, वाचता येतच नसल्याने इंग्रजीचा अभ्यास करायचा प्रश्नच नव्हता !!

बारावीचा वार्षिक परीक्षेचा फॉर्म भरला होता.  परिक्षेच्या अगोदर आठवडाभर आईला सांगितले की, ''मी गैप घेतो. परीक्षा देत नाही. मी इंग्रजीत नापास होईल आणि इतरही विषयांचा माझा अभ्यास झाला नाही. त्यामुळे पुढच्यावर्षी सर्व विषय घेऊन मी पुन्हा बारावीत बसतो.'' माझे हे बोलणे ऐकून आईला काय बोलावे हेच सुचत नव्हते. आईने मग काकुळतीला येऊन मला सांगितले की, 'परीक्षा दे. ज्या विषयात नापास होशील तेवढे विषय पुढच्या वर्षी देता येतील'. आई जरी खरे सांगत असली तरी तिचे ते बोलणे मला पटत नव्हते, पण मी आईच्या इच्छेखातर परीक्षेला जाऊन बसत होतो आणि पेपर देत होतो. इतर सर्व विषयांचे पेपर दिले. मात्र इंग्लिशचा पेपर दिला नाही. पेपरच्या दिवशी शेजारच्या गावात असलेल्या ग्रंथालयात जाऊन वाचत बसलो. त्या ग्रंथालयात जाताना माझ्या घराशेजारच्या एका व्यक्तीने मला पाहिले होते. त्याने ते घरी आईला सांगितले होते. मी सायंकाळी घरी गेल्यावर आईने माझ्यावर रागवायला सुरुवात केली. पण मी पेपरला गेलो होतो आणि पेपर दिला, यावर शेवटपर्यंत ठाम राहीलो. त्यामुळे रागारागिला पूर्णविराम मिळाला. मला वाटायचे की दिलेल्या पेपरपैकी एक-दोन विषयात मी नापास होणार आहे आणि पेपर न दिलेला इंग्रजी विषय आहेच. त्यामुळे पुढच्या वर्षी सर्व विषय घेऊन पुन्हा बारावीत बसायचे हे माझ्या डोक्यात पक्के होते. A, B, C, D पासून इंग्रजीचा अभ्यास सुरू करायचा, क्लास लावायचा आणि इतर विषयांचा छान अभ्यास करून चांगल्या गुणांनी पुढच्यावर्षी बारावी उत्तीर्ण व्हायचे, असे मी मनोमन ठरवले होते. 

तीनचार महिन्यांनी बारावीचा निकाल लागला. इंग्रजीसोडून मी सर्व विषयात पास झालो होतो. त्यामुळे माझी उलटीच चक्र फिरू लागली. सर्व विषय घेऊन पुन्हा बारावीत बसायचे स्वप्न मी विसरून गेलो होतो. ऑक्टोंबर महिन्यात केवळ इंग्रजीचा पेपर द्यायचा असे मी ठरविले. फॉर्म भरला. मात्र दोनतीन महिने जवळ असतानाही इंग्रजी लिहायला, वाचायला शिकलो नाही. काही अभ्यास केला नाही. त्यामुळे पेपर दिला नाही. पुन्हा मार्च महिन्यात होणाऱ्या परीक्षेसाठी फॉर्म भरला. क्लास लावला. वास्तव परिस्थिती सरांना मी समजून सांगितली. पण तिथेही क्लासला नियमित जाईल तो मी कसला ? पण सरांनी व्याकरणाच्या आणि उताऱ्यांवरील प्रश्न सोडविण्याबाबत काही ट्रिक सांगितल्या. मी परीक्षेला जाऊन बसलो. पण पेपर पाहून माझे डोके गरम व्हायला लागले. 20-25 मिनिटांतच सरांना मी पेपर परत घ्यायचा आग्रह करू लागलो. पण सर म्हणाले की, अर्धापाऊण तास झाल्याशिवाय पेपर परत घेता येणार नाही. सर जवळ आले. माझा पेपर पाहिला. मागच्या पुढच्या मुलांचे पेपर पाहून मला काही रिकाम्या जागा, जोड्या लावा याची उत्तरे सांगू लागले. पण मला ते पटत नव्हते. माझ्यातील करारी कार्यकर्त्या जागा झाला. त्या वयात मी सरांना निक्षून सांगितले की, 'सर मला अजिबात काही उत्तरे सांगू नका. मला कुणाचे पाहून पासही व्हायचे नाही. कारण आपल्याकडे यापद्धतीने बेरोजगार पदवीधर पुष्कळ झाले आहेत. मला तसे व्हायचे नाही.'  माझे हे भाषण ऐकून सर गारदच झाले. मी मात्र अर्धा तास कुठेही मान न वळवता पुढच्या विद्यार्थ्याच्या डोक्याकडे पाहत शांत बसलो. माझे इंग्रजीचे शिक्षक परीक्षागृहात फेरी मारायला आले होते. तेव्हा त्या सुपरवायझर सरांनी माझ्याशी घडलेला किस्सा माझ्या इंग्रजीच्या सरांना सांगितला. त्या दोघांमध्ये काही तरी बोलणे झाले. माझे सर बाहेर जाताना माझ्याकडे पाहून हसत गेले. पुढे बारावीचा निकाल लागला. मी इंग्रजीत नापास झालो होतो. अशा रीतीने माझी बारावीत दोन वर्षे गेली.

जून महिन्यात कॉलेज सुरू झाले. मी रीतसर बारावीला कॉलेजला ऍडमिशन घेतले आणि माझे बारावीचे तिसरे वर्ष सुरू झाले. बारावीच्या वर्गात पहिल्या बैंचवर जाऊन वर्षभर बसलो. पहिल्या वर्षी माझे बारावीला काय झाले, दुसऱ्या वर्षी काय झाले आणि मी आता बारावीत पुन्हा कसा ? याची कुणाला काही उकल होत नव्हती. मी माझ्या इतर कलागुणांमुळे कॉलेजात प्रसिद्ध होतो, त्यामुळे इंगजीच्या प्रकारामुळे मी पुन्हा बारावीत आहे, अशी कुणाला शँका येण्याचीही शक्यता नव्हती. माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींना देखील माझा हा प्रवास माहीत असण्याची शक्यता नाही. कारण मी तितकी गुप्तताच पाळली होती. कुणी काही विचारले तर बारावीला गैप घेतला होता, इतकेच उत्तर मी द्यायचो आणि अन्य विषय बोलायला सुरुवात करायचो. बारावीचे वर्ष छान गेले. इंग्रजीत 35 गुण मिळून मी बारावीला 70 टक्के गुण घेऊन पास झालो. अशी ही बारावीची गंमत आहे.

पुढे मी बीए केले. जर्नालिझम केले. पुण्यात पत्रकारिता करतो आहे.  तेव्हा आणि आता इंग्लिश कसे आहे आणि इतर किस्से मी पुढे सविस्तर लिहिणार आहेच. पण एक सांगतो की, माझे आजपर्यंतचे कोणतेही लेखन जर पाहिले तर त्यात अद्यापही स्पेलिंगसह इंग्लिशमध्ये लिहिलेला एकही शब्द सापडणार नाही. यावरून माझे आजही इंग्लिश कसे असावे, हे ठरविणे कुणालाही सोपे जाईल.

© विशाल विमल, पुणे

Wednesday, 6 May 2020

आईच्या बायकोच्या नावात काय आहे ?

आईच्या बायकोच्या नावात काय आहे ? 

नावात काय विशेष आहे ? असे प्रसिद्ध नाटककार शेक्सपिअर यांनी म्हटले आहे. खरे तर नावात काही नसतेच,  विशेष असते ते व्यक्तीच्या कृतीमध्ये, व्यक्तीच्या अस्तित्वामध्ये. पण व्यक्तीच्या कृतीतून, अस्तित्वातून जे काही बरेवाईट घडते, ते त्या व्यक्तीच्या नावाला चिटकले जाते. याचा अर्थ व्यक्तीचे अस्तित्व, व्यक्तीची ओळख, व्यक्तीची कृती सांगण्याचे माध्यम म्हणजे त्या व्यक्तीचे नावं असते. 
कुणी जर आज त्याचे असलेले नाव बदलून प्रत्येक वर्षाला नवीन नाव दररोजच्या दैनंदिन जगण्यात स्वीकारायचे ठरवले तर कसे होईल? गेल्यावर्षी किंवा आजवर हे हे केले, ती व्यक्ती म्हणजे मीच आहे, असे एखाद्याने नवीन नाव धारण करून लोकांना सांगितले तर लोक त्यावर विश्वास ठेवणार नाही. त्या व्यक्तीला पुन्हा मग लोकांचा विश्वास बसण्यासाठी जुने नाव सांगावे लागेल. याचा अर्थ व्यक्तीला सतत स्वतःचे नाव बदलणे अवघड आहे. 

व्यक्तीचे नाव हे त्या व्यक्तीची ओळख सांगण्याचे माध्यम असते. पण ते नाव व्यक्तीला इतके चिकटते की एकदा स्वीकारलेले नाव सहजासहजी बदलणे, रद्द करणे, सोडुन देऊन नवीन नाव स्वीकारणे व्यक्तीला शक्य होत नाही. पण आजही आपल्याकडे लग्न झाल्यानंतर लगेचच 99 टक्के तरुणींची नावं बदलली जातात. अनेकींची ठरवून बदलली जातात तर अनेकींची का बदलायची नसतात, हे माहीत नसल्याने बदलली जातात. एखादया तरुणीचे वयाच्या 25 व्या वर्षी लग्न झाले, तर त्या तरुणीच्या वयाच्या 25 वर्षांपर्यंत तिच्या नावावर जी ओळख जमा झालेली असते, ती सोडून लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून नवीन नाव धारण करून वागावे लागते, हे अवघड आहे. उदा. एखाद्या सामान्य कुटुंबातील तरुणी महत्वाच्या कामगिरीने लग्नाच्या अगोदर महिनाभरापूर्वी सर्वत्र प्रसिद्ध झाली आहे. पण ती तरुणी लग्न होऊन, नवीन नाव धारण करून जेव्हा सासरी जाते तेव्हा हीच ती कामगिरीने प्रसिद्ध असलेली तरुणी आहे, हे कुणी ओळखत नाही. ज्यांना या तरुणीचे जुने आणि नवीन नाव माहीत असते, त्यांनाच ही प्रसिद्ध असलेली तरुणी आहे हे समजते.

तरुणीचे लग्नानंतर नाव का बदलायचे असते ? तर ती तरुणी माझी बायको आहे हे दाखविण्यासाठी त्या तरुणाला, तरुणीचे नाव बदलायचे असते. त्या तरुणीच्या वडिलांच्या नावाच्या ऐवजी त्या तरुणीच्या नवऱ्याला स्वतःचे नाव घालायचे असते. वडिलांकडील आडनाव काढून त्या ठिकाणी ही तरुणी 'या' परिवारातील 'याची' बायको आहे, हे दर्शवायला तरुणाचे स्वतःचे आडनाव तरुणीच्या नावाच्या शेवटी लावले जाते. अनेक बहाद्दर तर बायकोचे वडिलांकडीलं पहिले नाव बदलून स्वतःच्या मर्जीने वाटेल ते नाव ठेवतात. म्हणजे लग्नाच्या 25-30 वर्षापर्यंत त्या तरुणीचे असलेले पहिले, मधले, शेवटचे नाव लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पुसले जाते आणि त्या नावाबरोबर असलेली त्या तरुणीची ओळखही पुसली जाते, हे किती भयंकर प्रकरण आहे, याचा एकदा विचार करून पाहा. मी विचार केला म्हणून बायकोचे नाव पूर्वीचेच ठेवले आहे.  त्यात काही बदल केला नाही आणि खरे तर तो करण्याचा मला अधिकारही नाही. लग्नानंतर तरुणीचे नाव बदलायला खूप कागदोपत्री कुटाणे आहेत, पण नाव बदलायचे नसेल तर नवराबायको आहोत हे दाखविण्यासाठी लग्नाचे प्रमाणपत्र पुरेसे असते. लग्नाच्या प्रमाणपत्रावर तरुणतरुणीची लग्नाअगोदरची नावे असतात आणि त्यांनी विवाहबद्ध होऊन पतिपत्नी म्हणून एकमेकांचा स्वीकार केला आहे, असा त्यावर उल्लेख असतो. 

आपल्याकडे परंपरेने स्वतःचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव सांगितले आणि लिहिले जाते. पण मला 11 वर्षांपूर्वी माझ्या नावात वडिलांसह आईचेही नाव हवे असे वाटू लागले. व्यक्ती जन्माला येण्यामध्ये वडिलांपेक्षा आईचा वाटा हा अधिक असतो. बाळाचा गर्भ मी माझ्या गर्भाशयात वाढविणार नाही असे जर आई म्हटली तर जगातील कोणतेच वडील गर्भ वाढवू शकत नाहीत आणि बाळाला जन्मही देऊ शकत नाहीत. आजही बालसंगोपणात आईचाच वाटा अधिक आहे. आणि माझ्या आईचा वाटा तर माझ्या जडणघडणीत कुठेच कमी नाही, म्हणून मग मी वडिलांबरोबर माझ्या नावात आईचेही नाव लावायचे ठरवले आणि ते लावलेही. नाव बदलण्याचा मोठा उपद्याप माझ्या पाठीशी असल्याने आम्ही नवराबायकोने आमच्या बाळाचे नाव ठेवतानाच 'अर्शल आरजू विशाल' असेच कागदोपत्री सुरुवातीला सर्वठिकानी नोंदवले.

 'विशाल गणपत आडनाव' असे माझे जुने नाव होते. पण या नावात आईचे नाव समाविष्ट करून, आडनावातून जात समजते म्हणून आडनाव मला काढायचे होते. मात्र ज्यांना माझे आडनाव माहीत आहे, तिथे आडनाव न वापरता लगेच 'विशाल विमल गणपत' नाव वापरणे माझ्या ओळखीसाठी अवघड होते. त्यामुळे 'विशाल विमल गणपत आडनाव' असे मोठे नाव तयार झाले. त्याला काही पर्याय नव्हता. पुढे पाच वर्षे माझ्या जुन्या नावात आईचे विमल नाव समाविष्ट करून ते लोकांना माहीत होऊ दिले आणि  मग आडनाव काढून 'विशाल विमल गणपत' हे नाव वापरू लागलो. आज मी 'विशाल विमल', 'विशाल विमल गणपत', 'विशाल व्ही जी' या तिन्ही नावांनी परिचित आहे. पण मला नाव आवडते ते 'विशाल विमल' इतकेच. जुने नाव सोडून नवीन नाव धारण करणे किती अवघड आहे, हे या एका उदाहरणातून लक्षात येईल. 

- विशाल विमल गणपत