लैंगिकतेबाबत सर्व गोष्टींची शास्त्रीय माहिती देणे आणि लैंगिकतेसंबंधी समाजात निकोप दृष्टिकोन कसा पसरवता येईल यासाठी प्रयत्न करणे, या उद्देशाने सेक्शुलिटी एज्युकेशन नावाने आम्ही परिवर्तनवादी चळवळीतील साथींनी एक व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला आहे. गेल्या आठवड्यात 'स्त्रियांचे हस्तमैथुन' या विषयावर ग्रुपमध्ये चर्चा झाली. खरे तर ग्रुपवर कोणते प्रश्न विचारले आणि त्याला काय उत्तरं दिली, हे खूपच इंटरेस्टींग आहे. एक मात्र खरे की स्त्रियांनी हस्तमैथुन करणे योग्य आहे. त्याला शास्त्रीय आधार आहे. ती त्यांची नैसर्गिक गरज आहे, आणि हस्तमैथुनाबाबतचे समाजात गैरसमज देखील आहेत, आदी निरीक्षणे चर्चेतून समोर आली आली.
स्त्रियांनी हस्तमैथून करणे योग्य आहे, अशी भूमिका असणाऱ्या लोकांकडे मी या विषयासंबंधाने एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. त्यांच्याबाबत मला काही बोलायचे आहे आणि त्यांच्याकडून मला काही अपेक्षाही व्यक्त करायच्या आहेत. स्त्रियांचे हस्तमैथुन ही निकोप गरज आहे, तर मग हा विषय सामाजिक स्तरावर पुढे गेला पाहिजे का ? तर याचे उत्तर होय असे आहे आणि ते काम स्त्रियांनी हस्तमैथून करणे योग्य आहे, असे म्हणणाऱ्यांना धाडसाने करावे लागणार आहे. मात्र हा विषय कसा पुढे घेऊन जायचा ? त्याची चर्चा कशी घडवून आणायची ? आणि सामाजिक स्तरावर हा विषय जाहीर चर्चिला जाण्याची गरज काय आहे ? याचा विचार करून पुढे जावे लागणार आहे. एक मात्र खरे की या विषयाची निश्चितपणे आणि सातत्यपूर्ण जाहीर चर्चा होण्याची गरज आहे, यात अजिबात शंका नाही.
माहिती आहे, आता पुढे काय ?
1) लैंगिकता या विषयावर बोलताना आणि इतरांचे ऐकता जर आपण शास्त्रीय शब्दांचा वापर केला तर आपल्याला आणि पुढच्याला फारसा संकोच वाटत नाही. खरे तर लैंगिक विषयावर बोलायचे कसे याची सुरुवात भाषेपासून होते. त्यामुळे शास्त्रीय भाषा वापरून स्त्रियांचे हस्तमैथुन हा विषयदेखील आपण कुटुंबतील सदस्य, नातेवाईक, मित्रपरिवार येथे आपल्याला बोलायला स्पेस आहे, हे ओळखून तिथे आपण बोलू शकतो. याबाबत कुणाचे काही प्रश्न असतील तर त्यांना शक्य तेवढी शास्त्रीय उत्तरे देऊ शकतो. आजवर आपण या विषयावर जर बोलला नसाल तर यापुढे आपण बोलण्याचे धाडस केले पाहिजे.
2) आपल्यातील अनेकांना मी लैंगिक विषयातील प्रचारक समजतो. त्यामुळे संधी मिळेल तिथे सामाजिक विचारपीठावर मैथुनासंबंधी विषय निघाल्यास तिथे व्यक्त झाले पाहिजे. एकूणच लैंगिकता या विषयावर सामाजिक विचारपीठावर बोलणे टाळले जाते. कारण की, लैंगिकतेचा संबंध चारित्र्याशी लावला जातो. म्हणजे उघडउघड लैंगिकतेबाबत बोलणाऱ्या व्यक्तीकडे या व्यक्तीचे चारित्र्य कसे असेल ? या नजरेने पाहिले जात असल्याने सामाजिक क्षेत्रातील भलेभले लोक लैंगिकता या विषयावर बोलणे टाळतात. मैथुन हा विषय तर थेट कामजीवनाशी निगडित असल्याने त्यावर बोलणे धाडसाचे ठरणार आहे. पण हे धाडस आपल्याला करावे लागणार आहे आणि आपल्याकडे शास्त्रीय माहिती आणि शास्त्रीय शब्द असल्याने फार घाबरण्याची आवश्यकता नाही. जोवर हा विषय सामाजिक विचारपीठांवर मांडला जाणार नाही, तोवर या विषयाभोवतीची बंधने तुटणार नाही आणि हे काम आपल्याला करावे लागणार आहे. खरे तर हस्तमैथुनाबाबतची शिल्प ही खजुरा लेणी आणि अन्य अनेक ठिकाणी सापडतात. याचा अर्थ हा विषय झाकून ठेवण्याचा अजिबात नाही.
3) आपण हस्तमैथुनाकडे शास्त्रीय आणि निकोप दृष्टिकोणाने पाहत असल्याने आपल्या आजूबाजूच्या स्त्रियांच्या हस्तमैथूनाकडेही आपण असेच पाहणार आहोत. अत्यंत जवळच्या स्त्रियांना लागणारी हस्तमैथुनाबाबतची माहिती पुरविण्यापासून ते त्यांना इतरांची वाटत असणारी भीती घालविण्यासाठी मदत करणे, आदी गोष्टी आपण करू शकतो.
4) समाजात आजही स्त्रियांची लैंगिकता अर्थात कामजीवन नियंत्रित करून जातव्यवस्था आणि पुरुषव्यवस्था उभी आहे. हस्तमैथून हा कामजीवनाचा भाग आहे, हे आपण मान्य केले आहे. त्यामुळे हस्तमैथुनातून स्त्री जर स्वतः कामजीवनाचा आनंद घेऊ शकली तर काही प्रमाणात तरी स्त्रीयांच्या लैंगिकतेचे नियंत्रण ढिले होऊ शकते. त्यादृष्टीने स्त्रियांच्या हस्तमैथुनकडे पाहता येईल. खरे तर काही पुरुषांना स्त्रियांच्या हस्तमैथुनाबाबत भीती आहे की, जर स्त्रिया त्यांची लैंगिकता हस्तमैथुनामधून पूर्ण करतील, तर आमचे काही महत्त्व राहील की नाही ? आणि लैंगिकदृष्ट्या पण स्त्रिया इंडिपेंडेंट होतील की काय ? याची भीती काही पुरुषांना आहे. पण शेवटी पुरुषांना वाटणारी ही भीती निराधार आहे. लैंगिकतेबाबत असणारा पुरुषांचा दृष्टिकोन सुधारला आणि त्यांचे पुरुषी वर्चस्व त्यांनी कमी करून स्त्रियांशी जर सुसंवाद करण्याची आणि तिच्या एकूण स्वातंत्र्याची दखल घेतली तर पुरुषांना घाबरण्याची गरज नाही. आणि स्त्रियांकडे जसा हस्तमैथून हा पर्याय आहे तसा तो पुरुषांकडेही आहे.
5) लैंगिक शिक्षण हा विषय शालेय अभ्यासक्रमात येईल तेव्हा पाहू, पण किमान सध्या शालेय अभ्यासात जो थोडा काही भाग आहे, त्याबद्दल शिक्षक मुलांना शिकवतात का ? याकडे कुटुंबातील सदस्य वा पालक म्हणून आपण लक्ष ठेवू शकतो.
6) बुवाबाबा, फकीर, अम्मा आणि धर्माचे ठेकेदार जर हस्तमैथुन हा विषय धर्माच्या, पवित्र्याच्या, योनीसुचितेच्या नावाखाली झाकून ठेवत असतील. तर आपण शास्त्रीय माहिती देऊन तो उकरायचा.
© विशाल विमल
© रुपाली जाधव
No comments:
Post a Comment