Powered By Blogger

Friday, 17 July 2020

कळीचे फुल होताना मनात प्रश्नांची गर्दी

● शाळा, सोशल मीडिया, पालकांकडे उत्तरे आहेत का ? 
                                                  © विशाल विमल
अर्भक ते कुमारवयीन टप्प्यापर्यंत मुलामुलींच्या वाढीकडे पालकांचे लक्ष तरी असते. पण साधारण वयवर्षे 10 ते 20 या किशोरवयीन मुलामुलींकडे शिक्षकांचे, पालकांचे, दादाताईंचे, नातेवाईकांचे खरचं लक्ष असते का ? म्हणायला लक्ष असेलही पण त्या वयाच्या मुलामुलींशी त्यांच्या प्रश्नासंबंधी चर्चा, संवाद होतो का ? तर याचे उत्तर नाही असे आहे. कारण कुमारवयीन अवस्थेतून किशोरवयीन अवस्थेत प्रवेश करताना मुलामुलींमध्ये होणारे बदल हे लैंगिकतेशी निगडित असतात आणि आपल्याकडे नियम असा आहे की, लैंगिकतेवर बोलणे म्हणजे घाण, वाईट, लज्जास्पद आहे. त्यामुळे हा विषय जेवढा दाबून ठेवता येईल तेवढा सर्वजण दाबून ठेवतात. पण हा विषय असा आहे की, तो जेवढा फुग्यासारखा खाली दाबून ठेवला जातो, तो तितका वर उसळी मारतो. या वयात मुलामुलींच्या लैंगिक अवयवात, आवाजात, शरीररचनेत, दिसण्यात बदल होतात. मनात वेगवेगळ्या भावना निर्माण होतात. मूड बदलतात. दुसऱ्या व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होते, प्रेमाची भावना तीव्र होते. मनात गोंधळ असतो, गडबड असते, चीडचीड असते, तसा आनंद असतो, उत्साह असतो, उर्मी असते. विशेष म्हणजे या सर्वच्यासर्व गोष्टी नैसर्गिक आणि योग्य असतात. पण हे सर्व नक्की का घडत आहे ? हे सर्व सांगायला, आधार द्यायला, मनमोकळं करायला या मुलामुलींच्या जवळ कुणीही नसते. अशा विषयांवर शाळेतही बोलले जात नाही. अभ्यासात लैंगिकतेबाबत एखादा मुद्दा असेलच तर शिक्षक तो सोडून पुढचा मुद्दा शिकवतात. आपल्याकडे अशा विषयांवर घरात बोलणे, हे पाप समजले जाते. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत तर आणखी संभ्रमात पाडणारी माहिती उपलब्ध करून दिले जाते. मग या कळ्यांचे फुलांमध्ये रूपांतर होताना त्यांच्या मनात गर्दी केलेल्या प्रश्नांना उत्तरे कोण देणार आहे ? यापुढील काळात शाळा, पालक, सोशल मीडिया याची उत्तरे देतील अशी अपेक्षा ठेवूयात. 

आज या विषयावर लिहिण्याचे कारण म्हणजे परिवर्तनवादी चळवळीतील आम्ही साथींनी 'सेक्शुअल एज्युकेशन' नावाने व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला आहे. 'वयात येताना सर्व लैंगिक वैविध्य असणाऱ्या व्यक्तींमध्ये होणारे शारीरिक, मानसिक बदल' या विषयावर ग्रुपमध्ये गेल्या आठवड्यात चर्चा झाली. याविषयाच्या निमित्ताने ग्रुपमध्ये जे प्रश्न उपस्थित झाले, त्याला तिथे तज्ञ व्यक्तींनी उत्तरे दिली आहेत. पण ते प्रश्न केवळ ग्रुप पुरते मर्यादित नाहीत. सर्वांनीच त्या प्रश्नांकडे बारकाईने पाहिले पाहिजे. उपस्थित झालेले प्रश्न वाचून त्यावर आपल्याकडे उत्तरे आहेत का ? आणि असतील तर ती या वयातील मुलामुलींना कशी समजावून द्यायची, त्यामुलामुलींना कसे समजावून घ्यायचे, याचाही विचार प्रत्येकाकडून व्हायला हवा. आपल्याकडे उत्तरे नसतील तर मग काय करायचे, याचाही विचार व्हावा. 

निरागस प्रश्नांची गर्दी
मुले- मुली वयाच्या कितव्या वर्षांपासून वयात येण्यास सुरुवात होते?, त्यांच्यात शारिरीक व मानसिक बदल होण्यास किती वेळ लागतो?, दुसऱ्या व्यक्तीबद्दल आकर्षण कधी निर्माण होण्यास सुरुवात होते. मुलंमुलिंच्या मानसिक, शारीरिक बदलांमध्ये काही फरक असतो का? त्यांच्यामध्ये सेक्सच्या भावनांची सूरवात कूठल्या वयापासून  होते? वयात येताना शिश्न किंवा योनी भोवती केस वाढतात, अशावेळी स्वच्छतेच्याबाबतीत मार्गदर्शन करावे. कोणत्या वयात सेक्सची सुरवात करणे योग्य आहे. गूप्तांगावर कूठल्या वयात केस येण्यास सूरवात होते. पुरुष साधारण वयाच्या किती वयापर्यंत सेक्शुअल लाईफमध्ये परिपक्व होतो. वयात येणाऱ्या पाल्यांशी पालकांचा संवाद कसा असावा. एका ठराविक वयात पुरुषांच्या निप्पलमध्ये दोन्ही बाजूला हलकीशी गाठ येते आणि आपोआप निघून पण जाते. तर याचा आणि वयात येण्याचा काही संबंध असतो का? शालेय शिक्षणात कोणत्या इयत्तेपासून लैंगिक शिक्षण दिले गेले पहिजे. वयात येणाऱ्या मुलामुलींच्या आईवडिलांची जबाबदारी काय असावी? मुलगा वयात येत असताना जसा टेस्टेस्टेरॉन नावाचा हार्मोन शरीरामध्ये बदल घडवून आणत असतो, तर हा हार्मोस नंतर एक्सटर्नल काही सप्लिमेंट्स अथवा आयुर्वेदिक पद्धतीने वाढवता येतो का ?  येत असेल तर त्याचे फायदे-तोटे सांगा. मुलगा वयात येत असताना आईवडिलांनी कसं वागलं पाहिजे. वयात आल्यावर पाहिलं प्रेम होते, एखादी व्यक्ती आवडू लागते, पण सेक्स किंवा इतर काही करण्याची उत्तेजना होत नाही. त्या व्यक्तीला डोळ्यांनी पाहून मनाचे समाधान आणि आनंद होतो. तिथे सेक्स आणि इतर काही करण्याच्या उत्तेजन का होत नाहीत. वयात येताना मुलामुलींवर हार्मोसचे कसे परिणाम होतात. आपल्याकडे लग्नाचे वय मुलींचे 18 आणि मुलांचे 21 वर्ष किमान असावे लागते. हेच निर्बंध परदेशांमध्ये का नाहीत. पूर्वी मुली वयवर्षे 16 नंतर वयात यायच्या, आता वयाच्या 11, 12 व्या वर्षीच यायला लागल्या आहेत, याचे कारण काय आहे. वयात येण्याचा आणि आवाजात बदल होण्याचा काय संबंध आहे. मुलीच्या पहिल्या पाळीच्या वेळी गोडाचे जेवण का करतात. मुलंमुली वयात आल्यावर घरातील वातावरण कसे असावे. वयात येण्याची सुरुवात काहींमध्ये लवकर आणि काहींमध्ये उशीरा होण्याचे परिणाम आणि कारणे काय आहेत. वयात आल्यानंतर पाळी झाल्यावर मंदिर प्रवेश का नाकारला जातो? जे समलिंगी, तृतीयपंथी आहेत त्यांच्यात वयात येताना कोणते शारीरिक व मानसिक बदल होतात? वयात येताना तारुण्यपीटिका आणि शरीराचा वास का येतो.  काहींचे लिंग स्त्री की पुरुष हे निश्चित होत नाहीत, अशा मुलामुलींच्या काय भावना असतात. वयात येताना आगाऊपणा वाढतो का ? समाजाची बंधने नियम, कायदे-कानून मी का पाळू, मला पाहिजे तसे मी जगणार, अशी भावना का निर्माण होते. कधीकधी आईवडील सुद्धा दुश्मन वाटायला का लागतात, असे सर्वांच्या बाबतीत होते का ? एका बाजूला अकरावी, बारावी, करिअर्सचे टेन्शन आणि दुसऱ्या बाजूला वयात येतानाचे प्रचंड शारीरिक आकर्षण, असे सर्वांच्या बाबतीत होते का ? नुकत्याच वयात येणाऱ्या बहुतांश पोरांना आपल्यापेक्षा वयाने दुप्पट वयाच्या स्त्रिया आवडायला लागतात. याची काही सायकोलॉजिकल कारणे असावीत का? मुली वयात आल्यावर प्रथम संभोगाच्या वेळेस कोणत्या शारिरिक मर्यादा असाव्यात किंवा कश्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे..? लिंगाच्या आतील भागास रोज साबण लावून धुतले तर कोरडेपणा निर्माण होणार नाही का? मी ऐके ठिकाणी वाचले होते की लिंगाच्या कातडी आतील भाग केवळ पाण्याने धुवावा, साबण लावू नये. जे तृतीयपंथी असतात त्यांचे स्तन आणि योनी कशा प्रकारच्या असतात. कारण की त्यांनी ऑपरेशन केलं तर ते सक्सेस होतं का?
हे सारे प्रश्न वयात येणाऱ्या कोवळ्या कळ्यांच्या मनातील आहेत. याची उत्तरे आपल्याकडे आहेत का ? त्याची उत्तरे आपण या मुलामुलींना कशी देणार आहोत ?

(सेक्शुअल एज्युकेशन' नावाने व्हॉट्सअप ग्रुप नचिकेत कोळपकर, रुपाली जाधव, विशाल विमल, स्वप्नील मानव, मुक्ती साधना हे साथी चालवतात)

© विशाल विमल, पुणे

No comments:

Post a Comment