🔍 ती : खरे तर तुझे विचार इतके मोकळे आहेत. त्यात लग्न ही गोष्ट कुठंच बसत नाही. कारण लग्न म्हटलं की कमिटमेंट आली. अर्थात तुझं मत चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो
🔎 तो : कमिटमेंट आहेच माझी. पण ती संसारिक जबाबदारीशी आहे. सहजीवनाशी कमिटमेंट आहे. कमिटमेंट ही पुढच्या व्यक्तीला द्यावयाच्या प्रेम, सुख आनंद याच्याशी आहे. या पलीकडे जाऊन मी मैत्री, प्रेम केले तर मी माझी संसारिक कमिटमेंट मोडली, असे होत नाही.
मला इतके कळते की प्रेम, मैत्री या उदात्त आणि अमर्याद भावना आहेत. त्यांची पूर्ती एकाच ठिकाणी व्हावी आणि होतेच असे म्हणणे हे अनैसर्गिक मत आहे. ती एकाच ठिकाणी झालीच पाहिजे हा अनाठायी आग्रह आहे. मात्र प्रेमपूर्ती एकाच ठिकाणी होत असेल तर छानच.
🔍 ती : प्रेमपूर्ती एकाच ठिकाणी होत नाही का ?
🔎 तो : प्रेम, मैत्री ही भावना जर उदात्त आणि व्यापक आहे तर ती कोणत्या एकाच व्यक्तीच्या बंधनात अडकून कधी पूर्ण होईलच असे नाही. एकाच वेळी अनेक व्यक्तींशी मैत्री, प्रेम होते. पहिल्यांदा एकाशी, मग एकाशी असेही होते. हे सर्व नैसर्गिक आहे. प्रेम, मैत्रीत एकचएक म्हटले की, त्या नात्यात खरे प्रेम, मैत्री किती आणि केवळ सोबत किती ? हा मोठा प्रश्न आहे. प्रेम, मैत्री या विविधांगी भावना आहेत. एका व्यक्तीकडून त्यातील काही भावनांची पूर्ती होईल तर दुसऱ्या व्यक्तीकडून इतर भावनांची पूर्ती होईल. एकच व्यक्ती सर्व भावनांची पूर्ती करण्यात कमी पडते आणि त्या व्यक्तीकडे भावनांची पूर्ती करच असा आग्रह धरणे हे अयोग्य आहे. उलट या प्रकाराने ज्या भावनांची पूर्ती होऊन दोघांना जे समाधान मिळते, तेही मिळण्यात अडथळे येऊ शकतात. त्यामुळे जिथे मिळेल तिथून मैत्री, प्रेम मिळवत रहावे. फुलपाखराप्रमाणे....
🔍 ती : पण कमिटमेंट एकनिष्ठ राहण्याशी सुद्धा असते ना. लग्न या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो जोडणं. अर्थात काया, वाचा मनाने एकमेकांशी आयुष्यभरासाठी एकरूप होणं. अर्थात ही अट नाही, अपेक्षा आहे. आणि ती अपवादात्मक परिस्थितीत लागू पडत नाही. ही कमिटमेंट निभावता येणार नसेल तर लग्नाची औपचारिकता तरी कशाला हवी? Live in चा पर्याय आहेच की. तोही उत्तम पर्याय आहे.
🔎 तो : एकनिष्ठतेशी व्याख्या काय ? आणि कोणतीही पूर्ती होत नसेल तरी एकनिष्ठ का रहायचे ? एकनिष्ठता ही शाश्वत, सुखद, समाधानकारक आणि निखळ आयुष्य जगण्याला बाधक आहे. एकूणच व्यक्ती स्वातंत्र्यालाही बाधक ठरू शकते. खरे तर संसार, लग्न या संस्था स्त्री शोषणाची मुळं आहेत. पुरुषसत्तेने बाईला गुलामीत ठेवण्यासाठी लग्न, संसार, सेक्स याला पावित्र्याचे, एकनिष्ठतेचे आवरण चढवले.
🔍 ती : जिथं खरंच प्रेम आहे, समजून घेणं आहे, तिथं शोषणाला थारा नसतो.
🔎 तो : तुझे असे म्हणणे असेल तर त्यानुसार आजच्या कुटुंब व्यवस्थेत शोषण न झालेल्या अत्यंत कमी व्यक्ती सापडतील. याचा अर्थ कुटुंब संस्थेत प्रेम नाही तर, शोषण आहे. बरोबर का ?
🔍 ती : शेवटी विवाह हे समाज एकसंध ठेवण्यासाठी निर्माण केलेले बंधन आहे. ज्याला ते मान्य असेल त्यानीच लग्न करावे, अन्यथा लग्नाच्या भानगडीत पडू नये. विवाह ही संकल्पना निर्माण होण्यापूर्वी स्त्री-पुरुष संबंध मुक्त होते. त्यात चुकीचं काही होते असे मी मानत नाही. पण जन्माला येणाऱ्या संततीची जबाबदारी कोणी घेईना. म्हणून विवाह ही संकल्पना अस्तित्वात आली. आणि ती मान्य असेल तर तिच्या अटी, शर्ती, नियम पण मान्य असायलाच हवेत. ज्याला ते मान्य नाहीत, त्याच्याकडे विवाह न करता मुक्त संबंध ठेवण्याचं स्वातंत्र्य आहेच.
🔎 तो : कुणी केले विवाहाचे नियम ? पुरुषांनी ना ? कुणाच्या हिताचे ? स्वतःच्या ना ? तरीही विवाह संस्था पवित्र आणि उदात्त कशी असू शकते. संततीच्या संगोपनासाठी विवाह आणि कुटुंब व्यवस्था अस्तित्वात आली, हे भर देऊन आज सांगितले जाते. पण त्याला तितकेच कारण नाही. आणि तितकेच कारण असेल तर मग बालसंगोपनात पुरुषांचा वाटा किती असतो ? की उलट गर्भधारणा, मासिक पाळी, बालसंगोपन आणि सेक्सच्या माध्यमातून स्त्रीला पुरुष स्वतःच्या नियंत्रणात ठेवतो. तिची पिळवणूक केली जाते. तिला काबूत ठेवले जाते. असे असेल तर समाज एकसंध ठेवण्यासाठी विवाह, कुटुंब व्यवस्था आवश्यक आहे, असे स्त्रीने का म्हणावे ?
🔍 ती : स्त्रीला नव्हती का या विवाह, कुटुंब व्यवस्थेची गरज ?
🔎 तो : असेलही. पण आज तीच संस्था स्त्रीच्या शोषणाचं मूळ बनली आहे. त्यामुळे आज तरी ही संस्था स्त्रीच्या हिताची दिसत नाही. बाळ हवं ही स्त्रीची नैसर्गिक गरज नाही. विवाहित स्त्रीला बाळ हवं ही समाजाने घडविलेली भावना आहे. त्यामुळे बाळ नको हे तिला नाकारता येते, पण कुटुंब व्यवस्थेत तो तिला अधिकार नाही. कारण पुरुषी सत्ता बळकट करण्यासाठी पुरुषांच्या मेंदूतून विवाह, कुटुंब संस्था उभी केली गेली. त्यातील पहिला भाग हा आहे की, पुरुषी सत्तेला तिच्या भविष्यासाठी पुत्र हवा होता, वारस हवा होता आणि याच काळात स्त्रीला बळाच्या जोरावर पुरुषाला स्वतःच्या काबूत ठेवता येऊ लागले. लैगिक गरज ही स्त्री वैयक्तिक पातळीवर पूर्ण करू शकते. जोडीदार हवा असेल तर तोही भेटतो, पूर्वीही भेटत होता. मग लग्नाची गरजच काय ? पण सेक्ससाठी लग्नाची गरज पुरुषांनी निर्माण केली. स्त्रीच्या लैगिकतेवर पुरुषांना वर्चस्वासाठी हवी तशी मालकी हवी होती आणि यातूनच कुटुंब, लग्न संस्था प्रस्थापित झाल्या आणि स्त्री शोषणाच्या मूळ बनल्या. याकडे खरे लक्ष दिले पाहिजे.
🔍 ती : लग्न, कुटुंब व्यवस्था मग उपयोगाची नाहीच का ?
🔎 तो : माझं सुरुवातीपासून वाक्य आहे की, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि साथीदार व्यक्तीला समाधान देण्याची जबादारी पार पाडून मग जे करायचे ते करावे. खरे तर प्रत्येक नात्यात ही कमिटमेंट असते. संसार आणि लग्न संस्था स्त्रीवर लादण्यात आल्या. पुरुष आजही मुक्त आहे. संसाराचे नियम हे कोणत्या कायद्याने लिहिलेले नाहीत. त्यामुळे ते आज आपण कालसुसंगत ठेवू शकतो.
🔍 ती : असो. बोलू नंतर.
🔎 तो : होय. बाय.
(टीप : तो आणि ती कोण हे शोधण्यापेक्षा या संवादातील मुद्दे शोधून त्यावर विचार करूया !)
© विशाल विमल
--------------------
No comments:
Post a Comment