Powered By Blogger

Friday, 18 December 2020

भाग 3 : व्यक्तीस्वातंत्र्य, सामाजिक बंधने आणि मैत्री, प्रेम

🌷 ती : hi
🌱 तो : बोल, काय म्हणतेस ? आपण दोन दिवस खूपच बोललो ना.
🌷 ती : होय रे. इतकं सविस्तर सोशल मीडियावर बोलणं म्हणजे खूपच झालं. 
🌱 तो : होय. विषयच तसा मुक्तसंवादाचा आहे ना.
🌷 ती :  पण मला हे समजत नाही की इतके मुक्त संबंध ठेवायचे असतील तर लग्नाचा देखावा तरी कशाला? निव्वळ औपचारिकता म्हणून?
🌱 तो :  हे तुझे म्हणणे मला शंभर टक्के मान्य आहे. अनेकांची इच्छा असूनही सामाजिक बंधने म्हणून लोक लग्न करतात. काही जण धाडसाने आज ही लिव्ह इनमध्ये रहातात. तुम्ही कितीही क्रांतिकारक असला तरी हजारोवर्षांची संस्था एकट्याला मोडता येत नसते आणि सर्वांचा विरोध पत्करून एकानेच किल्ला लढविण्यासाठी त्याला आयुष्यही पुरणार नाही.
🌷 ती : तू लग्न का केलंस? Live in चा पर्याय का स्वीकारला नाही?
🌱 तो : होय. मी live in चा पर्याय निवडला होता. पण मला जातीबाह्य लग्न करून दोन जातीच्या व्यक्ती एकत्र नांदू शकतात, हा आजच्या परिस्थितीत संदेश द्यायचा होता. मी त्याला अग्रक्रम दिला. केवळ आणि केवळ या उद्देशाने मी लग्न केले.
🌷 ती : तू मानत नाहीस ना विवाह संस्था? मग याच संस्थेला शरण का गेलास? त्यासाठी लग्नाच्या औपचारिकतेची गरज नव्हती. लग्न न करताही ते साध्य करता आलं असतं.
🌱 तो : शरण नाही, त्या संस्थेचे फक्त नाव वापरले
आणि मी या समाजाचा भाग आहे. इच्छा नसताना काही नियम पाळले जातात.  नवीन रचना मी एकटा नाही ना करू शकत. पण प्रयत्न करतो आहे.  
🌷 ती : हेच ते. आपण समाजाचा एक भाग आहोत म्हणून सामाजिक नियम आपल्यालाही लागू होतात. त्यात जोडीदाराशी एकनिष्ठ राहणं हाही नियम आहे आणि ते स्त्री पुरुष सगळ्यांनाच लागू आहे. 
🌱 तो : एकनिष्ठतेबद्दल आपण बोललो आहोत. आजच्या कुटुंब, विवाह संस्थेतील जेजे तोडणे, झुगारने शक्य आहे, ते झुगारावे, तोडावे. तिच्यात राहूनच त्या व्यवस्थेला आतून शक्य तितके धक्के दिले पाहिजेत. 
🌹 ती : लग्न सुद्धा स्वातंत्र्याला बाधक आहे, कारण शेवटी तेही एक सामाजिक बंधन आहे.
🌱 तो : होय की. 
🌷 ती : Exactly हेच म्हणायचंय मला. सामाजिक नियम मान्य असतील तरच लग्न करा, अन्यथा करू नका. तुमच्यावर कोणीही जबरदस्ती करत नाही. पण आयुष्याचा जोडीदार म्हणून कुणाला स्वीकारलं आहे, तर तिच्याशी प्रामाणिक रहा, पारदर्शक रहा. खरं प्रेम असेल, तिथं विश्वास आपोआप येतो. तिथं कसलीही लपवाछपवी करायची गरजच पडत नाही.
🌱 तो : यातील अनेक वाक्य एकमेकांशी परस्पर विसंगत आहेत.
1) सामाजिक नियम कुणी ठरवले ? जसे सामाजिक नियम पळायचे असतात, तसे ते मान्य नसतील तर तोडायचेही असतात. मात्र सामजिक नियम मान्य नसतील तर समाजात राहू नये, असे बोलणे अयोग्य ठरेल. 
2) कुटुंबाचे, विवाहाचे नियम कुणी ठरवले. 100 वर्षांपूर्वी होते, ते आज नियम नाहीत. मग ते कुणी आणि का बदलले. मग आज कुणी बदलत असेल तर त्यात गैर काही नाही.
3) लग्न नव्हे तर प्रत्येक नात्याची कमिटमेंट असते. संसार म्हणून जबाबदारी आणि साथीदाराचे समाधान हे कुटुंब, संसार याची कमिटमेंट आहे, असे मी मानतो. या पलीकडे कोण काय करते, हा व्यक्ती स्वातंत्र्य भाग आहे. ते स्वातंत्र्य घेतले म्हणजे कमिटमेंट नाही, असे म्हणणे हे म्हणणे गैर आहे.
पण कुणी कौटुंबिक जबाबदारी पाळली नाही, साथीदारचे समाधान केले नाही आणि बाहेर प्रेम मैत्री शोधली, तर अशा व्यक्तीची संसारात कमिटमेंट आहे असे कुणी म्हणत असेल तर ते हास्यास्पद आहे. आणि आज असंख्य लोक असेच वागतात आणि यालाच कमिटमेंट म्हटले जाते. त्यामुळे संसार हे शोषनाचे मूळ बनले आहे.
4) खरं प्रेम आणि खोटं प्रेम असे काहीही नसते. प्रेम हे प्रेम असते. बाकी कल्पनाविलास आहे. 
5) विश्वास, एकनिष्ठता, सुचिता, प्रामाणिकपणा हे शब्द संसारात बंधन म्हणून वापरले जातात.
🌷 ती : आपल्याला कुटुंब, विवाह संस्था मान्य नसतानाही विशिष्ट सामाजिक नियमांचा स्वीकार करायला लागणे, हे आपण हतबल आहोत किंवा समाज वरचढ आहे, हे दर्शवते. समाज बदलण्याची ताकद आपल्यात आहे ना? मग का करावेत मनाविरुद्ध असे नियम मान्य? का जावं अशा नियमांना शरण? मला एवढंच कळतं, जे नियम आपल्याला मान्य नाहीत, ते बिनधास्त उडवून लावावेत. केवळ समाजाचा एक भाग म्हणून त्यांचा आश्रय घेऊ नये.
🌱 तो : अनेकांनी पूर्वीपासून आणि आजही या विवाह, कुटुंब व्यवस्थेचे जाचक नियम लावलेच की धुडकावून. आंतरधर्मीय विवाह हा विवाह संस्थेचा नियम नाही. बालसंगोपन, स्त्रीला घर कामात मदत हा विवाह संस्थेचा नियम नाही. हे नियम मोडले की अनेकांनी. विवाह संस्थेचे सर्व नियम एक व्यक्ती नाही मोडू शकत. एकाने नियम मोडणे हेही क्रांतीकारी असते. मुलींनी शिकू नये, याबाबत ही आता तू प्रतिवाद करते तसे तेव्हा केले जायचे. आपल्या व्यवस्थेत तर मुलींनी शिकणे म्हणजे पाप, धर्म बुडाला, स्त्री बिथरली असे समजले जायचे. महात्मा फुलेही सर्व नियम नाही नाकारू शकले, पण स्त्री शिकली पाहिजे. हा नियम त्यांनी तोडला. एक नियम मोडला तरी खूप मोठे परिवर्तन घडले. समाजाचे सर्व चुकीचे नियम, प्रथा एका झटक्यात मोडण्याची अपेक्षा ठेवणे हे बाळबोध आहे आणि मोडायचे तर सर्व नियम मोडा नाही तर मग आहे ते सर्व स्वीकारा, हे तर अतिबालिश झाले. कोणतेही परिवर्तन टप्प्याटप्य्याने येते हे लक्षात घेतले पाहिजे.
🌷 ती : तुझे विचार चूक आहेस, असं मी म्हणत नाही. पण एखादी विचारधारा स्वीकारताय तर पूर्णपणे स्वीकारा ना. आपल्या सोयीनुसार हे अर्ध, ते अर्ध असं नको.
🌱 तो : व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून पूर्णतः हेच स्वीकार अथवा तेच स्वीकारा, असे म्हणायला तसा काही अर्थ नाही. तिथे हवे ते स्वीकारले जाते. पण तरी आपण या मुद्द्याकडे कायद्याच्या नजरेतून पाहू. आपण कायद्याच्या राज्यात रहातो. येथे विवाहबाह्य संबंध अमान्य नाही. त्यामुळे विवाहबाह्य संबंध ठेवू नयेत, या विवाह संस्थेच्या अलिखित नियमाला अर्थ उरत नाही. आणि हेच करा किंवा तेच करा, यालाही अर्थ नाही. 
🌷 ती : विवाहबाह्य संबंध कायद्याला अमान्य आहेत.
तो : 150 वर्षे जुने असलेले भारतीय दंड विधान संहितेतील कलम 497 सर्वोच्च न्यायालयाने का रद्द केले ? आणि त्याने काय स्वतंत्र मिळाले, हे नक्की वाच. दोन वर्षपूर्वीच विवाहबाह्य संबध खुले केले. तेही मोदी सरकारच्या काळात. या कलमांतर्गत पूर्वी विवाहबाह्य संबध असतील तर त्या स्त्रीचा नवरा दुसऱ्या पुरुषवर केस करू शकायचा. पाह किती बोगस कलम होते. एखाद्या स्त्रीला संबंध हवे असतील, तिने ठेवले, तिला मान्य आहेत संबंध आणि केस कोण करणार तर तिचा नवरा. आता पतिपत्नी विवाहबाह्य संबध ठेवू शकतात. नवरा दुसऱ्या पुरुषावर केस करू शकत नाही. फसवणूक झाली तर एकमेकांवर दोघेच केस करू शकतात,
हा नियम तसा सगळीकडे आहे. तो इथेही लागू होतो.
ती :  अर्थात हे ज्याचं त्याचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. कुणी कसं वागावं, हे दुसऱ्यांनी कसं ठरवायचं ? मनावर दडपण येणार नाही, अशा पद्धतीने वागावं बस.
🌱 तो : स्वातंत्र्य मी मानतो, पण स्वराचार मानत नाही.
मी जे सांगतो आहे तसे स्वतंत्र येईलच,  पण अजून खूप शतके जावी लागतील.
🌷 ती :  तुझं म्हणणं बरोबर असेलही. पण मी एवढंच म्हणेन की, आपला कायदेशीर जोडीदार सोडून इतर कुणाशी संबंध ठेवण्यास आपल्याला काही नैतिक अडचण वाटत नसेल, आपण कम्फर्टेबल असू तर खुशाल ठेवावेत संबंध. पण आपण काही चुकीचं करतोय, आपल्या जोडीदाराशी cheating करतोय, या भावनेनं आपल्याला अपराधी वाटायला नको.
🌱 तो : अत्यन्त बरोबर आणि या व्यतिरिक्त वागण्यात समाधान देखील नाही. आपण दोघे या एकाच मतावर आलो का फायनली ?
🌷 ती : असू दे की मतभेद. मित्र आहोत म्हणून प्रत्येक गोष्टीवर एकमत असलंच पाहिजे असं कुठं आहे?
🌱 तो : मला मतभेद असण्यात काहीही अडचण नाही.
मदभेद कुठवर कमी झाले, यासाठी मी विचारले
आणि तुझे ते समारोपाचे वाक्य आणि मी कालपासून जे बोलतोय, ते एकच आहे. त्यामुळे मी मतभेद कमी झालेत असे समजतो.
🌷 ती : असू नये एकमत. रंगत येते छान.
🌱 तो : आपण दोघे या मतावर आलो का फायनली. 
🌷 ती : असं म्हणू शकतो.!!
तो : खूप वर्षांनी मी बोललो या विषयावर बघ
🌷 ती : बरं वाटलं असेल नं?
🌱 तो : जगण्यात, मनात विचार तर आहेच
पण बोलल्यावर बरे वाटले
🌷 ती : All credit goes to me
🌱 तो : होय. चल बाय
🌹 ती : बाय.
#समाप्त

(टीप : तो आणि ती कोण हे शोधण्यापेक्षा या संवादातील मुद्दे शोधून त्यावर विचार करूया !)

© विशाल विमल
--------------------------

भाग 2 : विवाह-कुटुंब संस्था आणि विवाहबाह्य संबंध

🔎 तो : तुला माझे रात्रीचे काय मुद्दे पटले आणि नाहीत. तुझे काय मत आहे. 
🔍 ती :  खरे तर तुझे विचार इतके मोकळे आहेत. त्यात लग्न ही गोष्ट कुठंच बसत नाही. कारण लग्न म्हटलं की कमिटमेंट आली. अर्थात तुझं मत चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो
🔎 तो : कमिटमेंट आहेच माझी. पण ती संसारिक जबाबदारीशी आहे. सहजीवनाशी कमिटमेंट आहे. कमिटमेंट ही पुढच्या व्यक्तीला द्यावयाच्या प्रेम, सुख आनंद याच्याशी आहे. या पलीकडे जाऊन मी मैत्री, प्रेम केले तर मी माझी संसारिक कमिटमेंट मोडली, असे होत नाही. 
मला इतके कळते की प्रेम, मैत्री या उदात्त आणि अमर्याद भावना आहेत. त्यांची पूर्ती एकाच ठिकाणी व्हावी आणि होतेच असे म्हणणे हे अनैसर्गिक मत आहे.  ती एकाच ठिकाणी झालीच पाहिजे हा अनाठायी आग्रह आहे. मात्र प्रेमपूर्ती एकाच ठिकाणी होत असेल तर छानच.
🔍 ती : प्रेमपूर्ती एकाच ठिकाणी होत नाही का ?
🔎 तो : प्रेम, मैत्री ही भावना जर उदात्त आणि व्यापक आहे तर ती कोणत्या एकाच व्यक्तीच्या बंधनात अडकून कधी पूर्ण होईलच असे नाही. एकाच वेळी अनेक व्यक्तींशी मैत्री, प्रेम होते. पहिल्यांदा एकाशी, मग एकाशी असेही होते. हे सर्व नैसर्गिक आहे. प्रेम, मैत्रीत एकचएक म्हटले की, त्या नात्यात खरे प्रेम, मैत्री किती आणि केवळ सोबत किती ? हा मोठा प्रश्न आहे. प्रेम, मैत्री या विविधांगी भावना आहेत. एका व्यक्तीकडून त्यातील काही भावनांची पूर्ती होईल तर दुसऱ्या व्यक्तीकडून इतर भावनांची पूर्ती होईल. एकच व्यक्ती सर्व भावनांची पूर्ती करण्यात कमी पडते आणि त्या व्यक्तीकडे भावनांची पूर्ती करच असा आग्रह धरणे हे अयोग्य आहे. उलट या प्रकाराने ज्या भावनांची पूर्ती होऊन दोघांना जे समाधान मिळते, तेही मिळण्यात अडथळे येऊ शकतात. त्यामुळे जिथे मिळेल तिथून मैत्री, प्रेम मिळवत रहावे. फुलपाखराप्रमाणे....
🔍 ती : पण कमिटमेंट एकनिष्ठ राहण्याशी सुद्धा असते ना. लग्न या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो जोडणं. अर्थात काया, वाचा मनाने एकमेकांशी आयुष्यभरासाठी एकरूप होणं. अर्थात ही अट नाही, अपेक्षा आहे. आणि ती अपवादात्मक परिस्थितीत लागू पडत नाही. ही कमिटमेंट निभावता येणार नसेल तर लग्नाची औपचारिकता तरी कशाला हवी? Live in चा पर्याय आहेच की. तोही उत्तम पर्याय आहे.
🔎 तो : एकनिष्ठतेशी व्याख्या काय ? आणि कोणतीही पूर्ती होत नसेल तरी एकनिष्ठ का रहायचे ? एकनिष्ठता ही शाश्वत, सुखद, समाधानकारक आणि निखळ आयुष्य जगण्याला बाधक आहे. एकूणच व्यक्ती स्वातंत्र्यालाही बाधक ठरू शकते. खरे तर संसार, लग्न या संस्था स्त्री शोषणाची मुळं आहेत. पुरुषसत्तेने बाईला गुलामीत ठेवण्यासाठी लग्न, संसार, सेक्स याला पावित्र्याचे, एकनिष्ठतेचे आवरण चढवले.
🔍 ती : जिथं खरंच प्रेम आहे, समजून घेणं आहे, तिथं शोषणाला थारा नसतो.
🔎 तो : तुझे असे म्हणणे असेल तर त्यानुसार आजच्या कुटुंब व्यवस्थेत शोषण न झालेल्या अत्यंत कमी व्यक्ती सापडतील. याचा अर्थ कुटुंब संस्थेत प्रेम नाही तर, शोषण आहे. बरोबर का ?
🔍 ती : शेवटी विवाह हे समाज एकसंध ठेवण्यासाठी निर्माण केलेले बंधन आहे. ज्याला ते मान्य असेल त्यानीच लग्न करावे, अन्यथा लग्नाच्या भानगडीत पडू नये. विवाह ही संकल्पना निर्माण होण्यापूर्वी स्त्री-पुरुष संबंध मुक्त होते. त्यात चुकीचं काही होते असे मी मानत नाही. पण जन्माला येणाऱ्या संततीची जबाबदारी कोणी घेईना. म्हणून विवाह ही संकल्पना अस्तित्वात आली. आणि ती मान्य असेल तर तिच्या अटी, शर्ती, नियम पण मान्य असायलाच हवेत. ज्याला ते मान्य नाहीत, त्याच्याकडे विवाह न करता मुक्त संबंध ठेवण्याचं स्वातंत्र्य आहेच.
🔎 तो : कुणी केले विवाहाचे नियम ? पुरुषांनी ना ? कुणाच्या हिताचे ? स्वतःच्या ना ? तरीही विवाह संस्था पवित्र आणि उदात्त कशी असू शकते. संततीच्या संगोपनासाठी विवाह आणि कुटुंब व्यवस्था अस्तित्वात आली, हे भर देऊन आज सांगितले जाते. पण त्याला तितकेच कारण नाही. आणि तितकेच कारण असेल तर मग बालसंगोपनात पुरुषांचा वाटा किती असतो ? की उलट गर्भधारणा, मासिक पाळी, बालसंगोपन आणि सेक्सच्या माध्यमातून स्त्रीला पुरुष स्वतःच्या नियंत्रणात ठेवतो. तिची पिळवणूक केली जाते. तिला काबूत ठेवले जाते. असे असेल तर समाज एकसंध ठेवण्यासाठी विवाह, कुटुंब व्यवस्था आवश्यक आहे, असे स्त्रीने का म्हणावे ?
🔍 ती : स्त्रीला नव्हती का या विवाह, कुटुंब व्यवस्थेची गरज ?
🔎 तो : असेलही. पण आज तीच संस्था स्त्रीच्या शोषणाचं मूळ बनली आहे. त्यामुळे आज तरी ही संस्था स्त्रीच्या हिताची दिसत नाही. बाळ हवं ही स्त्रीची नैसर्गिक गरज नाही. विवाहित स्त्रीला बाळ हवं ही समाजाने घडविलेली भावना आहे. त्यामुळे बाळ नको हे तिला नाकारता येते, पण कुटुंब व्यवस्थेत तो तिला अधिकार नाही. कारण पुरुषी सत्ता बळकट करण्यासाठी पुरुषांच्या मेंदूतून विवाह, कुटुंब संस्था उभी केली गेली. त्यातील पहिला भाग हा आहे की, पुरुषी सत्तेला तिच्या भविष्यासाठी पुत्र हवा होता, वारस हवा होता आणि याच काळात स्त्रीला बळाच्या जोरावर पुरुषाला स्वतःच्या काबूत ठेवता येऊ लागले. लैगिक गरज ही स्त्री वैयक्तिक पातळीवर पूर्ण करू शकते. जोडीदार हवा असेल तर तोही भेटतो, पूर्वीही भेटत होता. मग लग्नाची गरजच काय ? पण सेक्ससाठी लग्नाची गरज पुरुषांनी निर्माण केली. स्त्रीच्या लैगिकतेवर पुरुषांना वर्चस्वासाठी हवी तशी मालकी हवी होती आणि यातूनच कुटुंब, लग्न संस्था प्रस्थापित झाल्या आणि स्त्री शोषणाच्या मूळ बनल्या. याकडे खरे लक्ष दिले पाहिजे.
🔍 ती : लग्न, कुटुंब व्यवस्था मग उपयोगाची नाहीच का ? 
🔎 तो : माझं सुरुवातीपासून वाक्य आहे की, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि साथीदार व्यक्तीला समाधान देण्याची जबादारी पार पाडून मग जे करायचे ते करावे. खरे तर प्रत्येक नात्यात ही कमिटमेंट असते. संसार आणि लग्न संस्था स्त्रीवर लादण्यात आल्या. पुरुष आजही मुक्त आहे. संसाराचे नियम हे कोणत्या कायद्याने लिहिलेले नाहीत. त्यामुळे ते आज आपण कालसुसंगत ठेवू शकतो.
🔍 ती : असो. बोलू नंतर.
🔎 तो : होय. बाय.

(टीप : तो आणि ती कोण हे शोधण्यापेक्षा या संवादातील मुद्दे शोधून त्यावर विचार करूया !)

© विशाल विमल
--------------------

प्रेम, प्रेमातील बंदीस्थपणा आणि विवाहबाह्य प्रेमसंबंध (भाग : 1)

● तो : प्रेमात पड, म्हणजे प्रेम कविता सुचतील.
◆ ती : पडून, आपटून झालंय. आता नको परत.
● तो :  ते तुमचं प्रेम होतं,  अस मला तरी वाटत नाही.
आणि प्रेम एकदाच, एकाच व्यक्तीवर होते ही अंधश्रद्धा आहे.
◆ ती : परत तितक्या intensity नं कोणी आवडलंच नाही. तुलना होते नुसती.
● तो : तुलना केली की मग अवघडच. वेगवेगळे गुण, दुर्गुण असतात प्रत्येक व्यक्तीत. मला आता कुणी आवडले तरी मी करेल प्रेम. 
◆ ती : बायको झोडपेल नं चांगली.
● तो : नाही, हा व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे. 
◆ ती : असेलही स्वातंत्र्य. पण आपल्या आयुष्याचा जोडीदार वाटून घेण्याएव्हढं मन मोठं नसतं कोणाचंच. म्हणजे असूया निर्माण होतेच मनात.
● तो : नवरा बायको म्हणजे एकमेकांच्या वस्तू नाहीत.
इतरांनी कुणी घ्यायच्या नाही किंवा इतरांकडे जायचं नाही.
--------
● तो : प्रेम, मैत्री, सेक्स या उदात्त भावना आहेत. त्या अमर्याद आहे. समजा, नवराबायको हे कौटुंबिक जबाबदाऱ्या,  शारीरिक, भावनिक गरजा एकमेकांच्या पूर्ण करत असतील आणि अजून अन्य ठिकाणी त्यांचे संबंध प्रस्थापित झाले तर त्यात गैर काय आहे.
◆ ती : असं बोलणं सोपं आहे. प्रत्यक्षात करणं कठीण आहे.
● तो : होय, म्हणून तर सांगतो, असे वागायला खूप प्रगल्भता लागते. 
◆ ती : तू बायकोला सांगू शकशील की माझे दुसऱ्या कोणाशी संबंध आहेत? आणि ती स्वीकारू शकेल हे? आणि तिनं असं केलं तर तू स्वीकारू शकशील?
● तो : आजवर तर बोलण्याच्या पातळीवर वैयक्तिक आणि जाहीर व्यासपीठावर अशी मांडणी दोघांनी करत, हे मान्य केले आहे. जगण्याच्या पातळीवर अवघड नाही. आणि मी तिला अडविणारा कोण ? आणि तिने दुसरे कुणावर प्रेम केले तर ती माझे काय हिरावून नेत आहे ? माझी बायको म्हणून ती संसारिक जबाबदाऱ्या सांभाळते, त्यापलीकडे तिचे व्यक्ती स्वातंत्र्य आहे. मी कोण तिला अडविणारा ?
◆ ती : मन तयार तरी होईल का असं करायला? आनंद तरी वाटेल का मनाला?
● तो : आपल्यावर एकेरी आणि बंदीस्थ संस्कार झाले आहेत. उदात्त संस्कार झाले नाहीत. प्रेम ही भावनाच उदात्त आहे. आई, वडील, भाऊ बहीण यांच्यावर प्रेम करताना नाही हा प्रश्न पडत ? मित्र - मैत्रिणी, प्रियेसी - प्रियकर येथे का हा प्रश्न पडतो ?  कारण या प्रेमात लैंगिकतेचा विचार केला जातो. आणि आपल्याकडे लैंगिकतेमध्ये बंदीस्थपणा आणून ठेवला आहे. नॉर्मल विचारच केला जात नाही. खरे तर सेक्सशिवाय मैत्री, प्रेम असे नाते छान तयार होते. पण आपल्याकडे सेक्श म्हणजेच मैत्री प्रेम समजले जाते आणि त्यामुळे खूप बंधने लादली जातात मैत्री प्रेम यावर.....
◆ ती : आपल्या जोडीदारकडून सगळ्या गरजा पूर्ण होत असतील तर आपण इकडे तिकडे का जाऊ?
● तो : खरे तर गरज ही नुसती गरज नाही. प्रेम, मैत्री या उदात्त आणि अमर्याद भावना आहेत. त्या एकाच व्यक्तीकडून पूर्ण होतील हे कुणी सांगितले ?
-----------
◆ ती :  मला ती आपल्या जोडीदाराशी केलेली बेईमानी वाटेल. पण तो सक्षम नसेल तर मी जाईन कदाचित दुसरीकडे. कारण आपल्या इच्छा दडपून टाकणं ही स्वतःशी बेईमानी ठरेल.
● तो : हा तुझा विचार फक्त लैगिकतेबाबत आहे. मी तो सोडून मैत्री, प्रेम याचा विचार मांडतोय. मैत्री, प्रेम करण्यात काय गैर आहे. खरे तर सेक्स करण्यात ही काही गैर नाही. पण हा मुद्दा नंतर बोलू.
◆ ती : प्रेम आहे म्हणून शरीर द्यावंसं वाटणं हे सहज आहे. तुला जर कुणाबद्दल प्रेम वाटलं तर तू बायकोला सांगू शकशील मोकळेपणाने?
● तो : 1 लाख 1 टक्के सांगेन. पण तिला सांगायची अथवा तिच्या परवानगीची गरज काय ? असाही माझा प्रश्न आहे
◆ ती : तू सांगेन म्हणतो, पण इतका मोकळा विचार फार कमी लोक करू शकतील. पण तुझा जो दुसरा प्रश्न आहे, त्याबाबत मला असे वाटते की तिला सांगण्याऐवढा मोकळेपणा आणि विश्वास हवा तुमच्या नात्यात?
● तो : पण मला सांग, बायकोला का सांगायचे ? ते माझे व्यक्ती स्वातंत्र्य आहे ना ? मग मी का सांगायचे ? मी तिच्या बाबतच्या सर्व गोष्टी पूर्ण करतो, तर मग मी तिला त्या पलीकडचे का सांगायचे ? लग्नाअगोदर आपण कुणाशी प्रेम केले, सेक्स केले हे आई-वडील आणि होणाऱ्या बायकोला- नवऱ्याला सांगतो का ?
● तो : समजा एखादी स्त्रीच्या प्रेम मैत्री याबाबतच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत. मी वर बोललो तसे. पण त्या स्त्रीच्या नवऱ्याच्या नसतील तर त्या स्त्रीने बाहेर कुणावर प्रेम, मैत्री करायची नाही का ? मग त्या पत्नीचे व्यक्ती स्वातंत्र्य कुठे गेले ?
◆ ती :  शरीर, मन, आयुष्य हे सगळं share करतोच की आपण आपल्या जोडीदाराशी.
● तो: पण आपल्या शरीर, मन, आयुष्यावर मालकी नसते जोडीदाराची.
◆ ती : मालकी नसतेच त्याची. तो गाजवत नसेलही. पण आपल्याला त्यालाच मालकी द्यावीशी वाटत असेल तर?
● तो : म्हणून तर मी म्हटलो की, आपल्याकडे संस्कार आहे. तो हाच संस्कार की लग्न म्हणजे पती-पत्नी एकमेकांचे मालक
◆ ती : नाही रे. ती प्रेमाची मालकी असते. आपण स्वतःहून देऊ केलेली. त्यासाठी कोणी आपल्यावर जबरदस्ती करत नाही.
● तो : हा हा हा...त्याला मानसिक गुलामी म्हणतात. प्रेम किती आणि भावना, शरिरावर नियंत्रण अर्थात मालकी किती हे पहा. नवराबायकोत प्रेमाची मालकी असती ना तर प्रेमाची अशी असंख्य उदाहरणे सापडली असती. पण नवराबायकोच्या प्रेमाची उदाहरणे फार नाही. याचा अर्थ त्या नात्यात फार प्रेम नसते. असते ती बहुतांशी शारीरिक मालकी आणि लग्नाची गाठ.
◆ ती : असेलही. जाऊ दे, मी झोपतीये
● तो : जाऊ दे म्हणजे ?
◆ ती : झोप फार आलेली. म्हणून म्हटलं रे.
● तो : मला वाटले की तुझी चिडचिड झाली.
◆ ती : नाही नाही.
● तो : Gn
◆ ती : Gn

(टीप : तो आणि ती कोण हे शोधण्यापेक्षा या संवादातील मुद्दे शोधून त्यावर विचार करूया !)

© विशाल विमल
________________