ना. ग. ऊर्फ नानासाहेब गोरे. हे नाव मला माहीत पडले ते, डॉ. अनिल अवचट यांचे 'माणसं' आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे 'भ्रम आणि निरास' ही नव्वदीच्या दशकात प्रकाशित झालेली पहिलीवहिली पुस्तके वाचल्याने. या दोन्ही पुस्तकांना नानासाहेबांच्या प्रस्तावना आहेत. त्यानंतर वाचनात आला तो नानासाहेबांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त 1987 साली प्रकाशित झालेला 'गोरे गौरव ग्रंथ'. या ग्रंथांत अनेक मान्यवरांचे नानासाहेबांबद्दल लेख आहेत. पण त्यात शेवटी स्वतः नानासाहेबांनी लिहिलेला 'तिमिरातुनी तेजाकडे' हा लेख आहे. आयुष्याचा फार मोठा काळ ओलांडून नानासाहेब अनुभव आणि विचारांची शिदोरी घेऊन एका टप्प्यावर उभे असताना हा लेख लिहिलेला आहे. त्यामुळे लेखातील ते शब्द अत्यंत तर्कशुद्ध आणि बुद्धिप्रामाण्यवादी आहेत. ते वाचून सळकन वीज चमकावी तसे डोक्यात चमकले होते आणि त्या विजेचा लख्ख प्रकाश आजही डोक्यात आहे.
नानासाहेबांची जडणघडण, व्यक्तिमत्व, कृती आणि विचार हे दीपस्तंभ आहे. नानासाहेब म्हणजे भारतातील समाजवादी आणि राजकीय चळवळीतील अग्रगण्य नाव आहे, हे विधान अजिबात धाडसाचे नाही. मात्र नानासाहेबांचे धडाडीचे व्यक्तिमत्व आणि धगधगते विचार पेलविणे मात्र धाडसाचे ठरेल. १९०७ ते १९९३ अशी ८५ वर्षे नानासाहेब जगले. १९३० साली वयाच्या 23 व्या वर्षी मिठाच्या सत्याग्रहात सहभागी झाल्याने नानासाहेबांना तुरुंगवास झाला. हा सुरू झालेला प्रवास पुढे असाच चालू राहिला. अनेकदा तुरुंगवास, काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना, चले जाव आंदोलन, समाजवादी पक्षाची स्थापना, लोकसभेच्या निवडणुकीत दोनदा पराभूत, तर एकदा काकासाहेब गाडगीळांचा पराभव करून विजयी. समाजवादी पक्षात फूट, प्रजा समाजवादी पक्षाची स्थापना, पुन्हा समाजवादी पक्षाचे एकीकरण, राज्यसभेवर खासदार , जनता पक्षाच्या काळात ब्रिटनमध्ये उच्चायुक्त, साधना साप्ताहिकाचे संपादक असा हा नानासाहेबांचा प्रवास झालेला आहे. रोजनिशी, ललित लेख, पत्रे, लेखसंग्रह, भाषण संग्रह, प्रस्तावना, पुस्तक परीक्षणे, तत्वचिंतन, बालसाहित्य, भारताची पूर्व सरहद्द, अमेरिकेच्या संघराज्याचा इतिहास, आपली संसद अशी 24 पुस्तक नानासाहेबांनी लिहिली. नेहरू, जयप्रकाश नारायण, सर्वपल्ली राधाकृष्णन, कालिदास, मिनू मसानी, राजेंद्र प्रसाद यांच्या 6 पुस्तकांचे अनुवाद नानासाहेबांनी केले आहेत. या सर्व पुस्तकातील निवडक लेख 'नारायणीय' या पुस्तकात आहेत. तसेच न्या. नरेंद्र चपळगावकर, वसंत बापट, ग. प्र. प्रधान यांचेही विशेष लेख या पुस्तकात आहेत. नानासाहेबांचा 'तिमिरातुनी तेजाकडे' हा लेख देखील या पुस्तकात समाविष्ट आहे. त्यामुळे हे पुस्तक नक्की वाचा.
'नारायणीय' या पुस्तकाची पहिली आवृत्ती ही नानासाहेबांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित झाली होती. लेखांची निवड आणि पुस्तकाचे संपादन ग. प्र. प्रधान आणि वसंत बापट यांनी केले आहे. 2001 साली या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित करताना 'तिमिरातुनी तेजाकडे' हा लेख त्यात समाविष्ट केला आहे. कालच (15 जून) नानासाहेबांच्या 115 व्या जयंतीचे औचित्य साधून साधना प्रकाशनने 'नारायणीय' पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित केली आहे. अर्थात वीस वर्षांनंतर या पुस्तकाची ही तिसरी आवृत्ती आली आहे. हे पुस्तक उपलब्ध करून दिल्याबद्दल साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांना खूप खूप धन्यवाद दिले पाहिजेत. या पुस्तकातील लेख म्हणजे नानासाहेबांच्या उंचीचे मापदंड आहेत. पुस्तकाची पार्श्वभूमी मांडताना विनोद शिरसाठ यांनी म्हटले आहे की, 'राजकीय नेते अशी प्रमुख ओळख असणारे नानासाहेब किती शैलीदार व विचारप्रवण करणारे लेखन करीत होते, याचा प्रत्यय हे लेख वाचताना येतो.' त्यामुळे हे पुस्तक सजग मराठी वाचकांनी नक्की वाचले पाहिजे. या पुस्तकाच्या शेवटी कव्हर पेजवर 'तिमिरातुनी तेजाकडे' या लेखतील काही वाक्य उद्धृत केली आहेत. त्यात नानासाहेब म्हणतात की, 'आतापर्यंत मी कोणालाही गुरू केलेले नाही. गांधी किंवा मार्क्सलाही नाही, हे यावरून स्पष्ट होईल. कारण या सतत बदलत्या विश्वाचे आणि मानवसमाजाचे अक्षरचित्र कोणापाशी कितीही दिव्यचक्षु असले तरी तो रेखांकित करू शकेल, असे मला वाटत नाही. कॅमेरा जशी क्षणचित्रे टिपतो तशीच आतापर्यंतच्या ऋषी-मुनींनी, विचारवंतांनी, प्रेषितांनी आणि विद्वानांनी टिपलेली आहेत. ती समाजचित्रे त्या काळाची, तत्क्षणीच्या परिस्थितीची चित्रे आहेत. म्हणून वेदकालीन चिंतन, कुरुक्षेत्रावरील चिंतन, बोधिवृक्षाखालील चिंतन, गॅलिलीच्या आसमंतातील आणि हिरा डोंगरावरील चिंतन हे, आजच्या चिंतनाला बंधनकारक ठरता कामा नये. याचा अर्थ ते सर्वस्वी त्याज्य ठरते, असाही नाही. नीर-क्षीर न्यायानेच त्याचा स्वीकार व्हावयास हवा.' हे वाचल्यावर नानासाहेब काय उंचीचा तार्किक विचार मांडत असतील याचा अंदाज येतो. याच लेखातील काही वाक्य पुस्तकात सुरवातीला छापली आहेत. त्यात नानासाहेब म्हणतात की, 'माझ्या जीवनात मी भावनेपेक्षा विचारांना आणि विचारांहुन कृतीला अधिक महत्व देत आलो आहे. म्हणूनच रामदासाहून शिवाजी थोर, रानडयांपेक्षा फुले थोर, बर्ट्रांड रसेलपेक्षा श्वाईटझर थोर, जे. कृष्णमूर्तींपेक्षा मदर तेरेसा थोर आणि अस्पृश्यतानिवारणासाठी स्पृश्यांची मने वळवू पाहणाऱ्या गांधीजींपेक्षा अस्पृश्यांनाच बंडासाठी उभे करणारे आंबेडकर मला थोर वाटतात.' नानासाहेबांची ही वाक्य वाचकांना कृतीप्रवन करण्यासाठी पुरेशी आहेत.
◆ नारायणीय : निवडक ना.ग.गोरे
संपादक : वसंत बापट / ग. प्र. प्रधान
प्रकाशक : साधना प्रकाशन 020 24459635
किंमत : 300 रुपये /सवलतीत 200 रुपये
© विशाल विमल
No comments:
Post a Comment