Powered By Blogger

Wednesday, 20 January 2021

मतदारांचे मेंदू जागृत करण्याचे अभियान राबवूया

◆ परिवर्तनवादी माणसे, संस्था, संघटनांना आवाहन
आजही ग्रामपंचायत निवडणुका या पद, प्रतिष्ठा, खुन्नस, घराणेशाही, जात, पैसे आणि पक्ष याचसाठी लढविल्या जातात आणि होतात, हे स्पष्ट दिसते. गावच्या सुधारणा करण्यासाठी क्वचित एखादा उमेदवार उभा रहातो. पण त्याने जर दारू, जेवण, पैसे दिले नाहीत तर त्याचा पराभव हा बहुमताने ठरलेला आहे. अनेक ठिकाणी तरुण निवडून आले, पण त्यांनी घाणेरड्या प्रस्थापित राजकारणाचा आधार घेतला आहे. काही ठिकाणी प्रस्थापितांच्या विरोधात जाऊन तरुण निवडून आले आहेत, मात्र त्यांनीही निवडणुकीत प्रस्थापितांप्रमाणे दारू, मटण, पैसे वाटले आहेत. क्वचित काही ठिकाणी जुने अंगठेबहाद्दर पुढाऱ्यांऐवजी तरुणाईला मतदारांनी कौल दिला आहे.

एका गावातील एका वार्डातील विजयी आणि पराभूत अशा दोन उमेदवारांचे खर्चाचे आकडे मी ऐकले. त्यातील पराभूत उमेदवाराने दीड लाख रुपये आणि विजयी उमेदवाराने निवडणुकीला साडेचार लाख रुपये खर्च केले आहेत. इतका खर्च करून विजयी उमेदवाराला 520 मते आणि पराभूत उमेदवाराला 460 मते मिळाली आहेत. त्या प्रभागात 218 कुटुंब आहेत, त्यातील किती कुटुंबात पैसे, मटणाचे जेवण आणि दारू दिली ? तर मला समजले की, पराभूत उमेदवाराने 70 ते 80 घरात दिले, तर विजयी उमेदवाराने 170 ते 180 घरात  दिले. याचा अर्थ मतदार किती लाचार आहेत हे लक्षात येते. त्यामुळे लाचार मतदार किती लायकीचे उमेदवार निवडून देत असतील हेही लक्षात येते. असे मतदार, असे उमेदवार असतील तर मग पुढील पाच वर्षात कोणता मतदार निवडून आलेल्या उमेदवाराला विकासकामे करा, असे वर मान करून सांगू शकतो ? आणि विकासाला बाजूला सारून निवडणुकीत लाखो रुपये खर्च झालेला पैसा भ्रष्टाचारातून मिळवायचे कोणता उमेदवार सोडू शकतो ?
एक उमेदवार पराभूत झाला, सांगत होता की लोकशाही विकली गेली. मी त्याला विचारले की निवडणुकीत खर्च किती झाला, तर म्हणाला की, माझा अडीच लाख आणि निवडून आला, त्याचा तीन सव्वातीन लाख रुपये झाला असेल. मग मला प्रश्न पडला लोकशाही विकायला तर हाही उभा होता आणि मग असे असेल तर, याला लोकशाही विकली असे म्हणण्याचा अधिकार आहे का ? खरे तर हाही अजून एक लाख रुपये अधिक खर्च करून निवडून आला असता तर याला लोकशाही आठवली नसती. एकंदरीत हा प्रकार सर्वठिकानी पहायला मिळतो, ठरवून दिलेल्या निवडणूक खर्चापेक्षा एक पैसाही अधिक खर्च न केलेला विजयी अथवा दुसऱ्या क्रमांकाचा पराभूत उमेदवार सापडणे अवघड आहे. हातावर मोजण्याइक्याच विजयी उमेदवारांनी असे अपप्रकार केले नाहीत, असे जर असेल तर मग अनेक प्रश्न निर्माण होतात.

महत्वाचे हे आहे की प्रस्थापित राजकाऱ्यांच्या विरोधात जाऊन मटण, दारू, पैशाचा वापर न करता निवडून येणे. पण असे चित्र दुर्मिळ आहे. जोवर असे चित्र सर्वत्र दिसत नाही तोवर लोकशाहीच्या भवितव्यावर प्रश्न चिन्ह आहे. मात्र तोवर माणसामाणसांची खूप मोठी हानी झालेली असेल. ती हानी भरून न येणारी असेलच, पण ती हानी वाढत जाणारी असेल !!

पर्याय एकच रहातो की जात, धर्म, घराणेशाही, पक्ष न पाहता आणि मटण, पैसे, दारू न घेता मतदान करणारे नागरिक तयार करणे. यासाठी मतदारांमध्ये खूप मोठी जागृती आणि सजगता निर्माण करावी लागणार आहे. खरे तर देशातील, राज्यातील कोणतेही सरकार मतदारांना अधिकाधिक शहाणे करण्यासाठी प्रयत्न करत नाही. कारण की लोकांना अज्ञानी, लाचार आणि बावळट ठेवून त्यांनाही मते घ्यायची असतात. ज्ञानी मतदार हे बावळट उमेदवार निवडत नाहीत आणि बावळट मतदार हे ज्ञानी उमेदवार निवडून देत नाही. त्यामुळे राजकारण्यांच्या दृष्टीने लोक बावळट राहिलेले अधिक हिताचे आहे. अर्थात हे सर्व बदलायचे असेल तर माणसामाणसांचा विचार करणारी परिवर्तनवादी माणसे, संघटना, संस्था यांनी लोकांचे मेंदू विवेकी करण्याचे अभियान राबवायला हवे. 

- विशाल विमल
--------------------