आईच्या बायकोच्या नावात काय आहे ?
नावात काय विशेष आहे ? असे प्रसिद्ध नाटककार शेक्सपिअर यांनी म्हटले आहे. खरे तर नावात काही नसतेच, विशेष असते ते व्यक्तीच्या कृतीमध्ये, व्यक्तीच्या अस्तित्वामध्ये. पण व्यक्तीच्या कृतीतून, अस्तित्वातून जे काही बरेवाईट घडते, ते त्या व्यक्तीच्या नावाला चिटकले जाते. याचा अर्थ व्यक्तीचे अस्तित्व, व्यक्तीची ओळख, व्यक्तीची कृती सांगण्याचे माध्यम म्हणजे त्या व्यक्तीचे नावं असते.
कुणी जर आज त्याचे असलेले नाव बदलून प्रत्येक वर्षाला नवीन नाव दररोजच्या दैनंदिन जगण्यात स्वीकारायचे ठरवले तर कसे होईल? गेल्यावर्षी किंवा आजवर हे हे केले, ती व्यक्ती म्हणजे मीच आहे, असे एखाद्याने नवीन नाव धारण करून लोकांना सांगितले तर लोक त्यावर विश्वास ठेवणार नाही. त्या व्यक्तीला पुन्हा मग लोकांचा विश्वास बसण्यासाठी जुने नाव सांगावे लागेल. याचा अर्थ व्यक्तीला सतत स्वतःचे नाव बदलणे अवघड आहे.
व्यक्तीचे नाव हे त्या व्यक्तीची ओळख सांगण्याचे माध्यम असते. पण ते नाव व्यक्तीला इतके चिकटते की एकदा स्वीकारलेले नाव सहजासहजी बदलणे, रद्द करणे, सोडुन देऊन नवीन नाव स्वीकारणे व्यक्तीला शक्य होत नाही. पण आजही आपल्याकडे लग्न झाल्यानंतर लगेचच 99 टक्के तरुणींची नावं बदलली जातात. अनेकींची ठरवून बदलली जातात तर अनेकींची का बदलायची नसतात, हे माहीत नसल्याने बदलली जातात. एखादया तरुणीचे वयाच्या 25 व्या वर्षी लग्न झाले, तर त्या तरुणीच्या वयाच्या 25 वर्षांपर्यंत तिच्या नावावर जी ओळख जमा झालेली असते, ती सोडून लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून नवीन नाव धारण करून वागावे लागते, हे अवघड आहे. उदा. एखाद्या सामान्य कुटुंबातील तरुणी महत्वाच्या कामगिरीने लग्नाच्या अगोदर महिनाभरापूर्वी सर्वत्र प्रसिद्ध झाली आहे. पण ती तरुणी लग्न होऊन, नवीन नाव धारण करून जेव्हा सासरी जाते तेव्हा हीच ती कामगिरीने प्रसिद्ध असलेली तरुणी आहे, हे कुणी ओळखत नाही. ज्यांना या तरुणीचे जुने आणि नवीन नाव माहीत असते, त्यांनाच ही प्रसिद्ध असलेली तरुणी आहे हे समजते.
तरुणीचे लग्नानंतर नाव का बदलायचे असते ? तर ती तरुणी माझी बायको आहे हे दाखविण्यासाठी त्या तरुणाला, तरुणीचे नाव बदलायचे असते. त्या तरुणीच्या वडिलांच्या नावाच्या ऐवजी त्या तरुणीच्या नवऱ्याला स्वतःचे नाव घालायचे असते. वडिलांकडील आडनाव काढून त्या ठिकाणी ही तरुणी 'या' परिवारातील 'याची' बायको आहे, हे दर्शवायला तरुणाचे स्वतःचे आडनाव तरुणीच्या नावाच्या शेवटी लावले जाते. अनेक बहाद्दर तर बायकोचे वडिलांकडीलं पहिले नाव बदलून स्वतःच्या मर्जीने वाटेल ते नाव ठेवतात. म्हणजे लग्नाच्या 25-30 वर्षापर्यंत त्या तरुणीचे असलेले पहिले, मधले, शेवटचे नाव लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पुसले जाते आणि त्या नावाबरोबर असलेली त्या तरुणीची ओळखही पुसली जाते, हे किती भयंकर प्रकरण आहे, याचा एकदा विचार करून पाहा. मी विचार केला म्हणून बायकोचे नाव पूर्वीचेच ठेवले आहे. त्यात काही बदल केला नाही आणि खरे तर तो करण्याचा मला अधिकारही नाही. लग्नानंतर तरुणीचे नाव बदलायला खूप कागदोपत्री कुटाणे आहेत, पण नाव बदलायचे नसेल तर नवराबायको आहोत हे दाखविण्यासाठी लग्नाचे प्रमाणपत्र पुरेसे असते. लग्नाच्या प्रमाणपत्रावर तरुणतरुणीची लग्नाअगोदरची नावे असतात आणि त्यांनी विवाहबद्ध होऊन पतिपत्नी म्हणून एकमेकांचा स्वीकार केला आहे, असा त्यावर उल्लेख असतो.
आपल्याकडे परंपरेने स्वतःचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव सांगितले आणि लिहिले जाते. पण मला 11 वर्षांपूर्वी माझ्या नावात वडिलांसह आईचेही नाव हवे असे वाटू लागले. व्यक्ती जन्माला येण्यामध्ये वडिलांपेक्षा आईचा वाटा हा अधिक असतो. बाळाचा गर्भ मी माझ्या गर्भाशयात वाढविणार नाही असे जर आई म्हटली तर जगातील कोणतेच वडील गर्भ वाढवू शकत नाहीत आणि बाळाला जन्मही देऊ शकत नाहीत. आजही बालसंगोपणात आईचाच वाटा अधिक आहे. आणि माझ्या आईचा वाटा तर माझ्या जडणघडणीत कुठेच कमी नाही, म्हणून मग मी वडिलांबरोबर माझ्या नावात आईचेही नाव लावायचे ठरवले आणि ते लावलेही. नाव बदलण्याचा मोठा उपद्याप माझ्या पाठीशी असल्याने आम्ही नवराबायकोने आमच्या बाळाचे नाव ठेवतानाच 'अर्शल आरजू विशाल' असेच कागदोपत्री सुरुवातीला सर्वठिकानी नोंदवले.
'विशाल गणपत आडनाव' असे माझे जुने नाव होते. पण या नावात आईचे नाव समाविष्ट करून, आडनावातून जात समजते म्हणून आडनाव मला काढायचे होते. मात्र ज्यांना माझे आडनाव माहीत आहे, तिथे आडनाव न वापरता लगेच 'विशाल विमल गणपत' नाव वापरणे माझ्या ओळखीसाठी अवघड होते. त्यामुळे 'विशाल विमल गणपत आडनाव' असे मोठे नाव तयार झाले. त्याला काही पर्याय नव्हता. पुढे पाच वर्षे माझ्या जुन्या नावात आईचे विमल नाव समाविष्ट करून ते लोकांना माहीत होऊ दिले आणि मग आडनाव काढून 'विशाल विमल गणपत' हे नाव वापरू लागलो. आज मी 'विशाल विमल', 'विशाल विमल गणपत', 'विशाल व्ही जी' या तिन्ही नावांनी परिचित आहे. पण मला नाव आवडते ते 'विशाल विमल' इतकेच. जुने नाव सोडून नवीन नाव धारण करणे किती अवघड आहे, हे या एका उदाहरणातून लक्षात येईल.
- विशाल विमल गणपत