Powered By Blogger

Saturday, 7 April 2018

आम्हा तरुण कार्यकर्त्यांचा आधार संपला

आम्हा तरुण कार्यकर्त्यांचा आधार संपला
भाई वैद्य यांचे 89 व्या वर्षी निधन

                               - विशाल विमल

आयुष्याचा फार मोठा पल्ला पार करून भाई वैद्य यांनी या जगाचा निरोप घेतला. भाई वयोवृद्ध असले तरी त्यांची समाजसाठी असणारी उपयोगिता दिवसेंदिवस वाढत जाणारीच होती. खरे तर आजच्या काळात भाईंची गरज अधिक आहे. आम्ही पत्रकारितेची नोकरी सांभाळून सामाजिक काम करतो. काम करत असताना आम्हाला भाईंविना एकटेपणा सहन करावा लागणार आहे. भाई म्हणजे आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना खूप मोठा आधार होता. तो आधार आता नसणार आहे. आधाराविना जगणं किती असह्य असतं, हा विचार आताच अस्वस्थ करू लागला आहे. सामाजिक काम करणं हे फार मोठं आव्हान असतं आणि आजच्या परिस्थिती तर ते अधिक वाढले आहे. अशा वेळी आम्हाला भाई हे खूपच आधार वाटतात. भाईंचा सामाजिक कामाचा प्रदीर्घ अनुभव, अभ्यास, संवाद कौशल्य आणि सामंजस्यपणा आम्हा कार्यकत्यांना फार उपयुक्त ठरला. काही आव्हानात्मक काम हाती घेतलं की भाई सोबत आहे म्हटलं की अर्धे काम फत्ते व्हायचे आणि मनावरील ताण कमी व्हायचा. भाई सोबत असले की अडचणी दूर होणार, भाई सोबत असले की तरी प्रतिगामी शक्ती जवळ फिरकणार देखील नाही, हा आमचा अनुभव आहे, हा भाईंचा फार मोठा आधार होता, आता तो संपला आहे. पण भाईंचे विचार आणि काम करण्याची पद्धत आमच्यासाठी कायमच मार्गदर्शक असतील, यात तिळमात्र शँका नाही.

जाती द्वेष संपविण्यासाठी आंतरजातीय-धर्मीय विवाहाची गरज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्यापासून ते वि. दा. सावरकर यांनी सांगितली आहे. याच विचारांचा धागा पकडून भाईंनी स्वतः च्या मुला-मुलींची आंतरजातीय लग्न लावून तो धागा घट्ट केला. आम्ही स्वतः देखील आंतरधर्मीय विवाह करताना भाईंनी खूप मोठे सहकार्य केले. परिवर्तन मिश्र विवाह संस्थेच्या माध्यमातून प्रा. विलास वाघ यांच्या सोबत आम्ही आंतरजातीय-धर्मीय विवाह पाठींबा, समर्थन आणि विवाह लावून देण्याचे काम करतो. अचानक घर सोडून लग्न करायचे म्हणून तरुण तरुणी आमच्याकडे येतात, त्यामुळे घरापासून ते समाजापर्यंत सर्वठिकाणी जातीय संवेदनशील वातावरण असते, या परिस्थितीत त्या तरुण तरुणीला आधार देत मार्ग काढायचा असतो. जीविताला धोका पोचेपर्यंत अंगावर प्रसंग येण्याची भीती असते. अशा वेळी आमच्या पाठीशी भाई ठामपणे उभे राहिले आहेत. आम्ही लावलेल्या अनेक आंतरजातीय धर्मीय विवाहांना भाई उपस्थित राहून आमचा ताण कमी करत. ऐनवेळी होणाऱ्या अशा लग्नांना देखील भाई आपली सामाजिक जबाबदारी समजून उपस्थित रहात. पण आता यापुढे भाई कधीच उपलब्ध होणार नाहीत, याचे खूप वाईट वाटते.

भाईंचे वाचन अफाट होते. याही वयात भाई वाचत आणि तेही नवनवीन विषयांवर त्यांचे वाचन असे. याही वयात तासोनतास भाषण देण्याची क्षमता, नवनव्या संदर्भासहित बोलण्याची हातोटी, स्पष्ट आणि कणखर आवाज हे सारं आश्चर्यकारक होत. भाईंची स्मरण शक्ती तर इतकी दांडगी होती की ते कार्यकर्त्यांची नावे कधी विसरत नसतं. ज्येष्ठ कार्यकर्त्यांची नावे स्मरणात रहाणे ठीक आहे, पण तरुण कार्यकर्त्यांची नावेही त्यांच्या ओठावर असत. अशा या चिरतरुण भाईंना श्रद्धांजली !